आंबेडकरी चळवळीची गाथा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. त्या चळवळीत ‘माणूस’ हा केंद्रबिंदू मानला गेला. मानवतेची भाषा अन् स्वाभिमानाचं जगणं यासाठी लागणारी ऊर्जा आणि प्रेरणा देण्याचं काम आंबेडकरी साहित्यानं केलं. त्या साहित्य आकाशातील एक लखलखता तारा म्हणजे ज. वि.
अर्थात जयराम विठ्ठल पवार.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणच्या मातीचा गंध निराळा आहे. रत्नागिरीचे रत्न ज. वि. पवार यांचा जन्म 15 जुलै 1944 रोजी झाला. आंबेडकरी चळवळीला दिशा प्रदान करण्याचं मौलिक कार्य करणारे
आदरणीय ज. वि. पवार यांचा आज 77 वा वाढदिवस…
महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांना व अभ्यासकांना याचा मनोमन हर्ष आहे.
ज. वि. पवार : व्यक्तित्व, साहित्य व चळवळ
बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे सक्षम व स्वाभिमानी नेतृत्व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वीकारले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार लोकशाहीचे सामाजिकरण झाले पाहिजे त्यासाठी चळवळीची भाषा बोलणाऱ्यानी कृती कार्यक्रमात सक्रिय होणे अभिप्रेत आहे. ज.वि. पवार त्यातीलच एक अग्रगण्य नाव होय.
आयुष्यभर आंबेडकर घराण्याशी इमान राखणारा एक सच्चा पाईक म्हणून सर्वांनाच ते सुपरिचित आहेत. वादळाचे वंशज ऍड. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार ज. वि. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात एक पिंपळ पान होत. ज. वि. पवार या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. अर्थात कवी, लेखक, समीक्षक, विचारवंत, वक्ता, लोकशिक्षक, संघटक, कार्यकर्ता, पँथर, प्रवक्ता, प्रशासक, संपादक इत्यादी.
ज. वि.च्या कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाने समाज मनावर विशेष ठसा उमटविला आहे. त्यांच्या प्रेरणेने अनेक कार्यकर्ते तयार झाले आहेत. फुले-आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या सारथी ज. वि. पवार सातत्याने पन्नास वर्षापासून साहित्य लेखन करून आपली सामाजिक कटिबद्धता जपत आहेत. आंबेडकर चळवळीतील त्यांचे समकालीन असलेले डॉ. गंगाधर पानतावणे, राजा ढाले, अरुण कांबळे, नामदेव ढसाळ, दया पवार, अर्जुन डांगळे इत्यादींनी ही अनेक आंदोलने केली. नंतरच्या काळात काहींनी वेगळी वाट निवडली नि तिची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. चळवळीत जन्माला येणारी अनेक माणसे पंख फुटले की चळवळीकडे पाठ फिरवतात, बेईमान होतात. काही ,पँथर भगव्या मोहाच्या नादात समाजाचा सौदा करून स्वतःला हरवून बसले आहेत.
महाकवी वामनदादांच्या शब्दात…
“तुझ्या पाऊल खुणा भीमराया
तुझी पोरं पुसू लागली रे
तुझ्या वैराच्या दारात जाऊन
पंगतीला बसू लागली रे”
सामाजिक भान व मूल्यांची जाण असलेले ज. वि. पवार आंबेडकरी चळवळीतील एक ‘माईलस्टोन’ आहेत. आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. परिवर्तनाच्या चळवळींचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जो प्रभाव आहे त्यातील एक महत्त्वाचं स्थान निर्माण करणारे एक अभ्यासक आहेत. ज.वि. भेदक वास्तव मांडून थांबत नाहीत तर अंधारयुगातून भीम-सूर्याच्या ‘प्रकाश वाटेने’ जीवनाचे कल्याण होणार आहे यावर त्यांचा दृढ विश्वास आहे.
जागतिक पातळीवर ज्या चळवळीची नोंद झाली ती भारतातील ‘दलित पँथर चळवळ’ तसेच ‘मास मोमेंट’, ‘बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’, ‘रिपब्लिकन चळवळ’, ‘भूमिहीनांची चळवळ’, ‘रिडल्सचा लढा’, ‘मंडल आयोग’, ‘नामांतर आंदोलन’, ‘आंबेडकर भवन’, ‘इंदुमील आंदोलन’, ‘भिमा-कोरेगाव आंदोलन’ ईत्यादि मध्ये त्यांनी आपले मौलिक योगदान दिलेले आहे. महाराष्ट्रातील कार्यकर्ता व अभ्यासक हे कदापी विसरू शकत नाहीत. आंबेडकर चळवळीतील एक महनीय व्यक्तिमत्व. ज. विं. नी साहित्य, समाजकारण व राजकारणात कठोरपणे कृतिशील भूमिका बजावली आहे. परिवर्तनवाद्यां मध्ये सुप्त दांभिकता व ढोंग याबद्दल विद्रोही ज. विं. ना खूप चीड आहे. सुरुवातीला प्रस्थापित समीक्षकांनी ज.विं. च्या साहित्याची पूर्णतः दखल घेतली नाही. पण “प्रतिभा किसी के कद्र की मोहताज नहीं होती” या उक्तीप्रमाणे ज. वि. आंबेडकरी चळवळीचे स्त्रोत ठरले आहेत. ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समस्त चळवळीचा इतिहास चां. ग.खैरमोडे
यांनी शब्द शिल्पांनी कोरुन ठेवला आहे. त्याच पद्धतीने ज. विं. नी
आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीचा मागोवा घेत त्यावर अभ्यासपूर्ण अनेक खंड लिहिले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासकांना आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ
समजून घेण्यासाठी ज. विं. च्या
साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.
आपल्या अवती-भवतीचं वातावरण फार बिघडलंय. स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला भुलवणारे अनेक आंबेडकर द्रोही आहेत ते आपल्या मालकांना खुश करण्यासाठी चळवळीचे व समाजाचे अगणित नुकसान करीत आहेत. येणारा काळ अशांना कधीही माफ करणार नाही.
प्राप्त परिस्थिती बदलण्यासाठी युवक व बुद्धिजीवीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आपले एकमेव आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनीच आम्हाला जगाकडे पाहण्याची निकोप दृष्टी दिली आहे. या दृष्टीनेच ज. वि. निरंतर प्रामाणिक कार्य करीत आहेत.
कडक भूमिका व नैतिक अधिष्ठान जपणार्या ज. विं. नी आपली लेखणी कधी विकली नाही.
ज. विं. चं मन सतत बंड करणारं आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पडसाद जसे समाज जीवनावर पडले तसेच ते त्यांच्या साहित्यातून ही उमटले. आपल्या भूमिकेशी सरांनी कधीही तडजोड केली नाही. जमीन, संपत्ती व श्रीमंतीचा कधी मोह धरला नाही.
या निमित्ताने कवी यशवंत मकरंद यांच्या ओळी फार प्रासंगिक वाटतात…
“ज.वि. सर,
सच है धन-दौलत, जागीर
आपने कुछ कमाया नहीं
पर गवाह है इतिहास
आपने अपना ईमान गवांया नहीं”
महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळावर पात्र नसलेले अनेक मान्यवर कार्यरत आहेत.
मात्र आंबेडकरवादी प्रतिमा कायम राहावी यासाठी तेथे काम करण्यास नकार दिला. मिळालेले अधिकार टिकविण्यासाठी आम्ही संघर्षशील राहणे आवश्यक असल्याची तळमळ ते व्यक्त करतात. व्यक्तीची ओळख व अस्तीत्व त्यांच्या भूमिकेवर ठरत असते. चळवळीमध्ये
जेव्हा भूमिका घेण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी समर्थ पणे ती घेतली. त्याचा त्रास ही झाला, तर आंदोलनामध्ये कधी प्रसंगी मारही खाल्ला पण आपल्या इराद्या पासून ते कधी ही विचलित झाले नाहीत.
स्वाभिमानी सत्तेचा सन्मार्ग : राजगृह
ज. वि. पवार हे एकमेव व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर, महाउपासिका मीराताई आंबेडकर, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय भिमराव आंबेडकर, सरसेनानी आनंदराज आंबेडकर व सुजात आंबेडकर असे एकूणच आंबेडकर घराण्यातील चार पिढ्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आहे.
ज. विं.ची राजगृहा वरील अपार निष्ठा यापेक्षा वेगळी काय असणार आहे. समस्त वंचित व बहुजनांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वाभिमानी नेतृत्व स्वीकारून तत्कालीन भारिप बहुजन महासंघामध्ये बाळासाहेबांच्या प्रत्येक आंदोलनात स्वतःला झोकून देऊन अथक कार्य करण्याचा संकल्प पूर्ण करीत आहेत. भारिप-बहुजन महासंघाच्या स्थापनेपासून ते आजतागायत वंचित बहुजन आघाडी च्या संपूर्ण राजकारणात अनेक चढ-उतार आलेत त्यामध्ये हिमालयासारखे ते बाळासाहेबां सोबत राहिले आहेत.
युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार व वारसा खऱ्या अर्थाने पेलणारे व सर्व सामान्यात रुजविणारे बहुजन नायक ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व सामान्य व्यक्तींना आमदार, मंत्री, सभापती, नगराध्यक्ष बनविले व सत्तेच्या चाव्या हातात देऊन बाबासाहेबांचा शासनकर्ती जमात बनण्याचे स्वप्न स्वाभीमानाने साकारले आहे. मागील काळात काहींनी साथ सोडली तर ज. वि. पवार, प्रा. अविनाश डोळस, अर्जुन डांगळे इत्यादींनी समर्थ साथ दिली.
ज. वि. पवार : ‘द पँथर’ काल व आजही
मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. वर्तमान काळातील अनेक प्रश्नांची वास्तववादी माहिती पत्रकारिते द्वारे जनतेपुढे यावी ही पवित्र भावना अपेक्षित असताना आज मीडिया या व्यवस्थेचा दलाल झाला आहे. जेव्हा सत्ते मध्ये माज येतो तेव्हा पत्रकारांची लेखणी बोलली पाहिजे. ‘सत्यमेव जयते’ चा
केवळ उद्घोष करत विकृत मानसिकतेची पाठराखण करण्याची मनोवृत्ती जवळपास अनेक पत्रकार व चॅनेल्स नी जोपासली आहे. जे लोकशाहीला अभिप्रेत नाही, संविधान व लोकशाहीचे संवर्धन करण्यासाठी मिडीयाने लोकमानसा मध्ये जागृती निर्माण केली पाहिजे. पत्रकारांनी नेहमी सत्तेतील विरोधी पक्षाची भूमिका अदा करणे गरजेचे आहे. देशात दलित, मुस्लीम, आदिवासी, भटके विमुक्त, महिला, कर्मचारी इत्यादी असुरक्षिततेची भावना व्यक्त करीत असताना पत्रकार व चॅनल्स
याकडे दुर्लक्ष का करीत आहे ? हा खरा प्रश्न आहे. ज. वि. पवार पक्षाचे प्रवक्ता म्हणून ई.टी.व्ही., महाराष्ट्र माझा, एबीपी न्यूज, टी.व्ही.-9 इत्यादी चॅनल्स वर डिबेटसाठी उपस्थित राहतात तेव्हा त्यांच्यातील प्रखर ऊर्जा आणि अभ्यासपूर्ण मांडणी, आक्रमक भूमिका पाहून त्यांच्यातील पन्नास वर्षापूर्वीचा पॅंथर आजही तितकाच पावरफुल असल्याचे जाणवते. स्वतःला पॅंथर म्हणणारे काही नेते सत्तेच्या स्वार्थांधाने चारोळ्या ठोकण्यात मशगुल असून आपल्या मालकांना खुश ठेवण्यासाठी समाजाची पत घालवत आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या स्वप्नातील समताधिष्ठित, धर्मनिरपेक्ष, मानवतावादी समाज घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे ज. वि. आपल्या रोख-ठोक भूमिकांसाठी सर्व परिचित आहेत. आयुष्यभर आपल्या लेखन व चिंतनातून विचार अभिव्यक्ती मधून मनुवादी व प्रतिगामी शक्ती विरुद्ध निरंतर संघर्षरत आहेत. आरएसएस, बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांच्या असंवैधानिक
धोरणावर तीव्र आक्षेप घेत समकालीन परिस्थितीत भीमा-कोरेगाव दंगलीचे मुख्य सूत्रधार संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे व नरेंद्र मोदीच्या एकाधिकारशाही वर वैचारिक हल्ला चढविणारे निर्भिड ज.वि. पवार आहेत. हिंदी विद्रोही कवी नागार्जुन, धूमील व दुष्यंतकुमार प्रमाणे कोणत्याही शक्तीला चुकीच्या भूमिकेबद्दल खडेबोल ऐकवण्याची
नैतिक हिंमत ज.विं. मध्ये आहे. काल आणि आज ही ज.वि. पवार पॅंथर चा बुलंद आवाज आहेत. प्रस्थापित मीडिया हा व्यवस्थेचा दास आहे परंतु बहुजनवादी मीडिया ही सोयीनुसार चळवळीला स्थान देतो एकूणच त्यांच्या भूमिकेवर साशंकता आहे. म्हणूनच एक मोठं व्हीजन असलेले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकाचे पुनः प्रकाशन केले आहे. यामध्ये सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून ही ज.विं. चे मौलिक योगदान आहे.
शासन लोकाभिमुख असायला हवे
मात्र ते भांडवलदारांचे झाले आहे. आज देशात एवढी अराजकता माजलेली असताना लेखक, साहित्यिक, विचारवंत, व्याख्याते, समीक्षक गप्प का आहेत. ऍड. बाळासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात “आम्ही सत्ताधारी होण्यासाठी प्रथमतः सत्ताधारी होण्याची मानसिकता करणे गरजेचे आहे” यासाठी आम्हाला राजकीय भूमिका निश्चित करावी लागणार आहे. यासाठी बुद्धिजीवी वर्गाने चळवळीशी एकनिष्ठ राहून मदत केली पाहिजे. सर्व परिवर्तनवादी चळवळी समोर अनेक आव्हाने आहेत. आज काल येथे विद्यापीठ व महाविद्यालयां मध्ये सत्यनारायण होऊ लागलाय… संशोधनावर खर्च करण्याची सरकारची भूमिका नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हमला होतोय. हत्या होत आहेत लेनिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वामी पेरियार यांच्या मूर्ती भंग करून कोणता आदर्शवाद निर्माण केला जाणार आहे ? विचाराच्या लढाईला बंदुकीने उत्तर दिले जात असताना आम्ही मात्र उघड्या डोळ्यांनी कुठवर पाहणार आहोत ? इतिहासात अनेक क्रांत्या झाल्या. आता बहुजन नायक बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचितांच्या हक्कासाठी आपल्यालाही नव्या क्रांतीसाठी तयार राहावे लागणार आहे. यासाठी आंबेडकरवाद्यांची मोठी जबाबदारी आहे. स्वाभिमानी बाणा घेऊन जगत असताना आंबेडकरी चळवळीत राहण्याची किंमतही मोजावी लागते. अनेक पुरस्कार, मान-सन्मान ज. विं. च्या तुलनेत अपात्र असलेल्या सामान्य व्यक्तींना मिळाले पण त्याची त्यांनी कधी ही पर्वा केली नाही.
ज. वि. आंबेडकरी चळवळीचे ‘ऊर्जा स्त्रोत’ आहेत. एकूणच ज. विं. च्या चिंतनाचा आवाका फार मोठा आहे. कला, साहित्य, संस्कृती, धर्म, इतिहास, राजकारण, आंदोलन इत्यादी वर ते अधिकारवाणीने मांडणी करतात. त्यांच्या सहवासाने नव साहित्यिकांना व कार्यकर्त्यांना एक प्रेरणा मिळते.
ज. वि. पवार एक माणूस म्हणून अंतर्बाह्य पारदर्शक आहेत. त्यांचा सहज सरळ स्वभाव, साधी राहणीमान व ध्येयवादी उच्च विचाराने ज.वि. पवार यांनी महाराष्ट्रात खूप आदराचे स्थान प्राप्त केले आहे. आज त्यांचा नाबाद 77 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ज. वि. पवार सरांना हार्दिक अभिष्टचिंतन व त्यांच्या भविष्यकालीन सर्व उपक्रमांना मंगल कामना…!
डॉ. सुरेश शेळके
नागनाथ महाविद्यालय,
औंढा ना., जि हिंगोली
तथा
प्रशिक्षक, वंचित बहुजन आघाडी