सलग दुसऱ्यावर्षी शिक्षणक्षेत्रावर कोविड-19 चे परिणाम दिसू लागलेत. कोविडमुळे जगातील सर्वांत वाईट पद्धतीने ग्रासलेल्या देशांत भारताचा समावेश झाला आहे. अनेक राज्यांनी शालेय परीक्षा रद्द केल्या आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएससी) कडे सर्व बोर्डाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्याकडून काही ठोस पावले उचलली गेल्यावर त्यांचं अनुकरण करता येईल हा आशावाद बाळगून अनेक बोर्ड असतात. नुकतीच त्यांनी दहावी बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे तसेच 12 वीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. इतर राज्यांबरोबर लगोलग महाराष्ट्र सरकारने सुद्धा आपला निर्णय याच आधारे घेतल्याचे जाणवते. मात्र विद्यार्थी आणि पालक यांच्या थोड्या संमिश्र प्रतिक्रिया आल्यात. अनेकांना हा निर्णय आवडला नाही तर अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
14 एप्रिलला झालेल्या अधिसूचनेत सीबीएसई ने जाहीर केले की दहावीचे निकाल मंडळाने विकसित केलेल्या उद्दिष्टांच्या आधारे तयार केले जावेत. त्याला त्यांनी ‘ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिअन’ म्हंटले आहे. गुणपत्रिका तयार करताना नेमक्या कोणत्या बाबींचा विचार केला आहे या विषयी अजून सविस्तर माहिती मिळालेली नाही. परंतु सध्या कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीत शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन प्रभावपणे करणे जिकिरीचं काम आहे. विद्यार्थी आणि पालक संभ्रमात आहेत. वर्षानुवर्षे एका विशिष्ट पद्धतीने मूल्यमापन करताना या वर्षी विद्यार्थ्यांची चाचणी सर्जनशील रचनात्मक मूल्यांकणातून करणे शक्य आहे का हा कळीचा मुद्दा आहे. खरं तर गेल्या वर्षांपासून बदललेल्या परिस्थितीचा अभ्यास करण्यास शिक्षणतज्ज्ञांना पुरेसा वेळ मिळाला होता. ऑनलाईन पद्धतीने शिकवताना किंवा शालेय कार्यक्रम राबवताना मिळालेल्या संधीतून काही शिकता येऊ शकले असते. नाविन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी काही पद्धती विकसित करता आल्या असत्या.
पारंपरिक शिक्षण पद्धतीने ‘अध्ययन निष्पत्ती’ केवळ परीक्षा परिणामांवर अधिक प्रमाणावर ठरविली जाते. वार्षिक परीक्षा झाल्या शिवाय शिक्षण पूर्ण होत नाही या समजुतीत अजून शिक्षक, पालक आणि विद्यार्थी अडकलेले आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्न किंवा स्मरणशक्ती आधारित प्रश्नांमधुन विद्यार्थ्यांचे ज्ञान तपासले जाते. या वर्षभरात शिक्षकांना प्रशिक्षित करणे शक्य होते. त्यांना विद्यार्थ्यांची ‘वैचारिक समज’ आणि ज्ञानाचा वापर करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी तसेच त्यासाठी आवश्यक सर्जनशील प्रश्न संच तयार करण्यासाठी प्रशिक्षण द्यायला हवे होते.
‘रचनात्मक मूल्यमापन’ ही एक अनेक चांगल्या पद्धतीमधील एक प्रभावी पद्धत आहे. ज्या मध्ये एक विशिष्ट धडा किंवा तो विषय शिकवून झाल्यावर मूल्यमापन करण्याची जुनी पद्धत आहे. त्यापेक्षा हा विषय शिकवत असताना दरम्यानच्या काळातच आकलन आणि प्रगती मोजण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. क्विझ, सर्जनशील असायनमेंट्स, चर्चा, प्रोजेक्ट्स, प्रेझेन्टेशन इत्यादींचा समावेश केला जातो. विद्यार्थी आणि पालकांमध्ये या पद्धतीचे महत्व निर्माण करणे आवश्यक आहे. वर्षाच्या शेवटी मूल्यमापन पद्धती ऐवजी वर्षभर मूल्यमापन असा दृष्टिकोन विकसित करणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांमध्ये ‘कुतूहलता’ आणि ‘विश्लेषणात्मक विचार कौशल्य’ विकसित करण्यामध्ये शिक्षकांची भूमिका प्रमुख असते. ‘अरसेली कमारगो ‘ नावाच्या न्यूरोसायंटिस्टच्या म्हणण्यानुसार एखाद्या विषयात जेवढी कुतूहलता जास्त तेवढी आकलनक्षमता जास्त. ज्याचा परिणाम दीर्घकालीन स्मृती जागरूक होण्यास मदत होते. विश्लेषण क्षमता मुलांना तार्किक विचार पद्धती साध्य करण्यास मदत करते. अशाप्रकारे कृतीआधारीत उपक्रम राबवण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे. संबंधित प्रश्नावली तयार करण्याचं काम शिक्षकांनी राबवायला हवं.
थोडक्यात, कोविड -19 चे दूरगामी परिणाम पाहता आपली येणारी पिढी अधिक सर्जनशील निर्माण करण्यासाठी शिक्षणक्षेत्रामध्ये प्रभावी आणि अर्थपुर्ण बदल करणे आवश्यक आहे.