अकोला: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात आपली वेगळी छाप पाडणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज अकोला महानगरपालिकेत प्रवेश केला. विजयी नगरसेवकांनी हातात भारताचे संविधान, राष्ट्रध्वज आणि संविधानाची प्रास्ताविका घेऊन या नगरसेवकांनी महापालिकेत पाऊल ठेवले. ज्याची शहरात मोठी चर्चा होत आहे.
अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. आज त्यांच्या कार्यकाळाचा पहिला दिवस होता. केवळ सत्ता उपभोगणे हा उद्देश न ठेवता, संविधानाप्रती निष्ठा आणि लोकशाही मूल्यांवरील विश्वास अधोरेखित करण्यासाठी या नगरसेवकांनी हातात संविधान घेऊन प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. (Vanchit bahujan aghadi)
हे आहेत ‘वंचित’चे पाच शिलेदार
महानगरपालिकेत लोकहिताचे प्रश्न मांडण्यासाठी खालील पाच नगरसेवक सज्ज झाले आहेत:
१) नीलेश देव
२) पराग गवई
३) उज्वला पातोडे
४) जयश्री बहादुरकर
५) शेख शमशू कमर उर्फ शेख साबीर
महापालिकेत प्रवेश करताना या नगरसेवकांनी केवळ औपचारिकता न पाळता, सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. संविधानाचा सन्मान राखून पारदर्शक आणि मूल्याधिष्ठित कारभार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.(Vanchit bahujan aghadi)
वंचित बहुजन आघाडीच्या या कृतीतून ‘सत्ता ही केवळ अधिकार गाजवण्यासाठी नसून ती संविधानाच्या चौकटीत राहून लोकसेवा करण्यासाठी आहे’, असा संदेश दिला आहे.






