परभणी : वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने गिरीश महाजन यांच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत असून, आज महाराष्ट्रभर गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार आंदोलने, निदर्शने तसेच ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
फुले–शाहू–आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, अन्याय व दडपशाहीविरोधात आपला तीव्र निषेध नोंदवत आहेत. (Vanchit bahujan aghadi)
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने मंत्री गिरीश महाजन वादाच्या भोवऱ्यात सापडले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून, परभणीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाजन यांच्या फोटोला जोडे मारून जोरदार निषेध करण्यात आला. “गिरीश महाजन यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना संबोधित केले. मात्र, या संपूर्ण भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. ही बाब समोर येताच संविधानप्रेमी, दलित संघटना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात गिरीश महाजन यांचा नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Vanchit bahujan aghadi)
आज परभणी येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला जोडे मारले.
राज्यघटनेमुळे मिळालेल्या पदावर बसून घटनेच्या शिल्पकाराचे नाव विसरणे हा जाणीवपूर्वक केलेला अवमान असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला. अशा मानसिकतेच्या मंत्र्याला मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यामुळे सरकारने त्यांची हकालपट्टी करावी. तसेच गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या जनतेची आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची माफी मागावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात येत आहे. (Vanchit bahujan aghadi)
या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे परभणी उत्तर जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही,” असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.





