अकोला : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वगळल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यातून गिरीश महाजन यांच्या विरोधात नागरिकांकडून आंदोलने करण्यात येत आहे.
आज गिरीश महाजन यांच्याविरुद्ध अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन देण्यात आले.
नेमकी घटना काय?
२६ जानेवारीला नाशिक येथे आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख टाळला. यावेळी महिला वनअधिकारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी प्रश्न उपस्थित केला आणि घोषणा दिल्या.

या घटनेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद दैंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारून आपला निषेध नोंदवला. गिरीश महाजन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांना तात्काळ बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला जिल्हाध्यक्षा आम्रपाली खंडारे, गजानन गवई, राजकुमार दामोदर, किशोर जामणिक, वंदना वासनिक, मंगला शिरसाट, अरूराधा ठाकरे, मनोहर पंजवानी, प्रदीप शिरसाट, नितेश कीर्तक, विकास सदांशिव यांच्यासह युवा आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






