नांदेड : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध नांदेडमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आज माता रमाई आंबेडकर चौक, सिडको येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.
नेमकी घटना काय?
नाशिक येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण केले. मात्र, या भाषणादरम्यान त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळल्याचा आरोप करण्यात येत आहे. ज्या संविधानामुळे भारत देश चालतो आणि ज्या संविधानामुळे महाजन मंत्री पदावर आहेत, त्याच संविधानाच्या निर्मात्याचा विसर पडणे ही अक्षम्य चूक असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

आंदोलकांच्या मुख्य मागण्या:
– मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करावा.
– या घटनेचा निषेध म्हणून त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.
जर कारवाई झाली नाही, तर गिरीश महाजन यांना आंबेडकरी युवकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य अक्षय बनसोडे यांनी दिला आहे.

“जगातील सर्वात मोठी लोकशाही ज्या संविधानामुळे टिकून आहे, त्या संविधानाच्या निर्मात्याला विसरणे हे दुर्दैवी आहे. या प्रकारामुळे संपूर्ण आंबेडकरी समाजात संतापाची लाट आहे.” असे अक्षय बनसोडे म्हणाले.
या आंदोलनावेळी जिल्हा महासचिव ॲड. वैभव लष्करे, महानगर अध्यक्ष गोपालसिंग टाक, जिल्हा उपाध्यक्ष राज बुद्धे, शुद्धोधन कापसीकर, सोनु मगरे, बंटी कोकरे, संदीप बेरजे, सम्राट आढाव, कश्यप पोवळे, आकाश चव्हाण, आकाश सुर्यवंशी, पंकज हाटकर, गौतम राक्षसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






