यवतमाळ : पुसद तालुक्यातील हिवळणी पालमपट येथे ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेवर लावण्यात आलेल्या पंचशील ध्वज हटवण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर निर्माण झालेल्या वादात वंचित बहुजन आघाडीने मोठी भूमिका बजावली. या प्रकरणी प्रशासकीय कारवाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांना पूर्ण पाठबळ दर्शवले असून, पुन्हा त्याच ठिकाणी कायदेशीर प्रक्रियेद्वारे ध्वज उभारण्याचे आश्वासन दिले आहे.
नेमके प्रकरण काय?
हिवळणी पालमपट येथील बौद्ध बांधवांनी ग्रामपंचायतीच्या जागेत पंचशील ध्वज लावला होता. मात्र, गावातील काही मनुवादी विचाराचे, प्रस्थापित राजकीय नेत्यांसोबत मिळून या ध्वजाच्या विरोधात तक्रार केली. या तक्रारीनंतर प्रशासनाकडून ध्वज हटवण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे स्थानिक बौद्ध बांधवांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. डी. के. दामोधर, जिल्हा संघटक बुद्धरत्न भालेराव, भीम टायगर सेनेचे किशोर कांबळे आणि सोशल मीडिया प्रमुख मधुर खिल्लारे यांनी तातडीने गावाला भेट दिली. कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून सविस्तर माहिती जाणून घेतली.
यानंतर शेंबाळपिंपरी पोलीस चौकी येथे एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद घागे, पुसदचे गटविकास अधिकारी आंदेलवाड, नायब तहसीलदार खाडे
यांच्यासोबत गावकऱ्यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष ॲड. डी. के. दामोधर यांनी गावकऱ्यांना शांततेचे आवाहन करताना सांगितले की, “कोणीही कायदा हातात घेऊ नका. महसूल आणि पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करू.” तसेच, ज्या ठिकाणी पंचशील ध्वज होता, त्याच ठिकाणी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रशासन आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा सन्मानाने ध्वज उभारला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी हिवळणी पालमपट येथील मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि युवक तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थित होती.






