पुणे : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा आरोप करत, पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जोरदार निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, प्रजासत्ताक दिनासारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय सोहळ्यात संविधानाच्या जनकांचा अवमान झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
आज दुपारी ४:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, पुणे स्टेशन येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंग्स, विधानसभा व प्रभागातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता चव्हाण, युवा आघाडीचे अध्यक्ष सागर आल्हाट, माथाडी आघाडीचे विशाल कसबे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चैतन्य इंगळे तसेच रेल्वे युनियनचे अध्यक्ष पदमश्री साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
“देशाच्या संविधानामुळेच आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. अशा वेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख न करणे हा अक्षम्य अपराध आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो आणि संबंधितांवर कडक कारवाईची मागणी करत आहोत,” अशी भूमिका शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी मांडली आहे.






