जालना : मौजे भोगगाव, ता. घनसावंगी येथे जातीय मानसिकतेतून बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यांची सुमारे ४० एकर ऊस शेती जाळल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी पूर्व विभागाचे जालना जिल्हाध्यक्ष डॉ. रामप्रसाद थोरात यांच्यासह परमेश्वर खरात, चोखाजी नाना सौंदर्य, जमीर शेख, समाधान तोडके, बाबासाहेब गलफडे, बाबासाहेब सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे झालेले मोठे आर्थिक नुकसान, जळालेल्या ऊस शेतीची स्थिती आणि पुढील कायदेशीर व शासकीय मदतीबाबत सविस्तर चर्चा केली. दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करावी, तसेच बाधित शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, इतकी गंभीर घटना घडूनही स्थानिक व मुख्य प्रवाहातील माध्यमे मौन बाळगत असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत असून, यावेळी मीडिया बधीर झाला आहे का? असा सवाल आंबेडकरी समाजाच्या वतीने उपस्थित केला जात आहे.





