महाडमध्ये समतादुतांची दोनदिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळा
पुणे : बार्टीचे समतादूत हे संपूर्ण राज्यात शासनाच्या तसेच सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या विविध योजनाचा प्रसार व प्रचार करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. शासनाच्या योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचण्यासाठी समतादुतांना समतादूत ॲपचा मोठा फायदा होईल. समतादूत हे शासनाचे मजबूत पाईक आहेत, त्यांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे वाहक व्हावे, असे आवाहान सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने दिनांक १९ व २० जानेवारी २०२६ रोजी समतादूत व प्रकल्प अधिकारी यांची दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा क्रांतीभूमी महाड , जिल्हा रायगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे आयोजित करण्यात आली या कार्यशाळेचे दुरुस्तथ प्रणालीद्वारे उद्घाटन डॉ. कांबळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे, विस्तार व सेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ बबन जोगदंड, लेखाधिकारी नितीन चव्हाण, सहाय्यक लेखाधिकारी उल्हास शिंदे, आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास महासंचालक सुनील वारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना डॉ. कांबळे म्हणाले, सामाजिक न्याय विभाग शासनाच्या १७ विभागांना योजनांसाठी निधी देत असतो. या सर्व योजनांचा प्रचार – प्रसार समदुतांनी करावा. शासनाच्या विकास योजनेच्या प्रक्रियेत समतादुतांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या प्रक्रियेत हिरीरीने सहभाग घेऊन आपल्या कामाचा ठसा उंचवावा असे, आवाहानही त्यांनी केले.
कार्यशाळेला संबोधित करताना महासंचालक सुनील वारे म्हणाले, महाड ही क्रांतिकारी भूमी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच क्रांतीभूमीत चवदार तळ्याचा सत्याग्रह करून समता प्रस्थापित केली. तो लढा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

समतादूत हे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या व सामाजिक न्याय विभागाच्या तसेच बार्टीच्या विविध योजनांचा प्रसार आणि प्रचार करतात. समतादूतांना अवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ.
समतादुतांनी बदलत्या काळानुसार आपल्यात बदल केला पाहिजे. नवे ज्ञान, नवे कौशल्य विकसित केले पाहिजे असेही ते म्हणाले. कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना विस्तार व सेवा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी सर्व राज्यातील प्रत्येक तालुक्यात आपले समतादूत चांगले काम करत असून समतादूतांच्या कामात गतिशीलता येण्यासाठी महाड येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केल्याचे सांगितले. तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या समतादूत आणि प्रकल्प अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करणार असल्याचे सांगितले.
समतादूत प्रकल्पाचे गतीने काम करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा समतादुतांनी वापर करवा, असे आवाहनही त्यानी केले. कार्यालयीन कामात शिस्त याविषयी निबंधक विशाल लोंढे यांनी सर्व समतादुतांना मौलिक मार्गदर्शन करून संवाद साधला. या कार्यशाळेला संपूर्ण राज्यातून ३०० समतादूत व प्रकल्प अधिकारी उपस्थित आहेत.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी समतादूत विभागाच्या प्रकल्प अधिकारी तेजस्वी सोनवणे, राजश्री कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाडचे व्यवस्थापक प्रकाश जमदाडे, माहिती जनसंपर्क अधिकारी लिना कांबळे, यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांनी केले. तर आभार रामदास लोखंडे यांनी मानले.






