रोटी-बेटी व्यवहारातील बंधनं आणि या विविध जाती समूहातील आपापसातील हितसंबंध किती शत्रूवत आहेत; हे खरं कां आपण बारकाईने तपासून पाहिलं तर शूद्र वर्णातील या अठरापगड जातीमध्ये खुपच भाईचारा आहे. सत्ता-संपत्ती-प्रतिष्ठेच्या वाटपामध्येही तुलनेने खुपच समानता आहे हे समजेल.
आपल्या देशातील बहुजनांची लोकधर्म-परंपरा ही आर्यांचे आक्रमण होण्यापुर्वीपासूनचीआहे. आर्यांची जन्मजात वंशश्रेष्ठत्वाचा आग्रह धरणारी व त्यासाठी रक्तशुध्दी-बीजशुध्दी च्या अनैसर्गिक आग्रहाने कमालीच्या क्रूर होणा-या ब्राह्मणी धर्मसंस्कृतीशी सुरुवातीच्या स्त्रीसत्ताक/ मातृसत्ताक संस्कृतीपासून जैन, बुध्द, लिंगायत, सुफी, शाक्त, इत्यादी लोकधर्म-परंपरांनी जोरदार लढा दिलेला आहे. ब्राह्मणी धर्माची वर्णश्रेष्ठत्वाची भूमिका आणि त्याआधारे सर्व प्रकारचे विशेषाधिकार ऊच्चवर्णियांना देणारे व इतर शूद्रादीशूद्र समाजाचे शोषण करणारे जुलमी ब्राह्मणी तत्वज्ञान व त्याच्याविरुध्द कष्टावर व समाजाच्या निर्मीतीक्षमतेवर इथे असलेले ’बहुजन हिताय-बहुजन सुखाय’ हे लोकधर्मातील तत्वज्ञान असा हा लढा हजारो वर्षे चालत आलेला आहे.
जाती संस्थेचा उगम
बुध्दकाळामध्ये दास्यांना मुक्त करून अदास बनविण्याच्या क्रांतीमधून जातीव्यवस्था एक उत्पादन व्यवस्था म्हणून जन्माला आली. या क्रांतीने समाजातील उत्पादक शक्ती मोकळ्या झाल्या आणि त्यामधून भौतिक व सांस्कृतिक भरभराटीचे युग आले. शुद्रातिशूद्रजातींचे नांव आपण घेतो; तेव्हा ते व्यवसायांचे नांव असते. उदा. लोहार, कुंभार, सुतार, इ. याउलट ब्राह्मणी वंशश्रेष्ठत्वाच्या मुद्द्याला कोणताही भौतिक आधार नाही.
ब्राह्मणी प्रगतीने देशोधडीला लागलेल्या अठरापगड जाती बहुजनांचे एकामागून एक उद्योग या जातिसमूहांच्या हातातून जाऊन ऊच्चवर्णियांच्या हाती गेले. राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक सत्तेच्या जोडीला लोहार, चांभार, तेली, सुतार, अशासारख्या व्यवसायातील मक्तेदार भांडवलदार तेच बनले. म्हणजे या सा-या प्रगतीने ब्राह्मणी वर्चस्वाला काडीचाही धक्का लागला नाही; उलट ती सहस्त्रपटीने ताकदवान बनली.
त्याउलट बकाल व कंगाल झालेल्या बहुजन जातींना भाषा, भूषा, निवास, रहाणी, इत्यादी अभिजनांच्या सांस्कृतिक हत्त्यारांनी सतत खालच्या दर्जाची वागणूक देवून त्यांचा सातत्यानेमानभंग करून आत्मभान गेलेला व सहज शोषण करता येईल असा बहुसंख्य समाज निर्माण केला.
चोर सोडून संन्यासाला फासी
अर्थात या जातीव्यवस्थेमध्ये सारे काही आलबेल आहे; असे मला मुळीच म्हणावयाचे नाही. जाती व्यवस्थेतील विकृतींची मुळे ब्राह्मणांच्या प्रभावामध्ये कितपत आहेत हा एक महत्वाचा संशोधनाचा विषय आहे.
तरिही या जातीसमूहांना स्वत:च्या अस्मितेसाठी अभिमान बाळगावे असे भौतिक कलाकौशल्यापासून ते लोकशाहीच्या पायावर उभे असलेले अनेक सांस्कृतीक ठेवे आहेत. त्यामध्ये बीजशुध्दीचा लवलेशही नाही. ही वस्तुस्थिती असता देखील आज बहुजनांच्या अस्मिता जागृतीला आणि लोकशाही आणि न्याय आकांक्षांना जातीयवादी म्हणून झोडपतांना दिसताहेत. ब्राह्मणी संस्कृतीच्या क्रूर व जुलमी मुलभूत स्वरुपाबद्दल मात्र सारे मूग गिळून गप्प आहेत.
सता बदलातून परिवर्तन
कार्लाईलचे एक सुप्रसिध्द वचन आहे. “when justice is the order of the day, disorder is the beginning of the justice” (जेव्हा अन्याय हीच सर्वसामान्य व्यवस्था असते; तेव्हा ’अव्यवस्थितपण” ही न्यायाची सुरूवात असते.) ब्राह्मणी धर्मसंस्कृतीच्या वर्चस्वाने ज्यांना शेकडो वर्षे सत्तेचा स्पर्शही होऊ दिलेला नाही; त्यांना”सत्ता मिळणे’ म्हणजेच प्रस्थापित व्यवस्थेत परिवर्तनाची सुरूवात असते. स्वत:च्या जाती-वर्ग समूहांचेप्रश्न सोडविण्यामध्ये त्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. याचे अगदी साधे उदाहरण म्हणजे पहिला मागासवर्गीय आयोग कालेलकर आयोगाचा अहवाल. डॉ. आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजिनामा देण्याचे केवळ एक हिंदू कोड बिलाबाबत मतभेद हे एकच कारण दिले जाते. घटनेतील अश्वासनाप्रमाणे इतर मागासवर्गिय जाती नोंदून त्यांच्या विकासासाठी खास तरतुदी ठरविण्यासाठी मागासवर्गिय आयोग नेमला नाही, हे कारण मात्र कावेबाजपणे लपविले जाते. या बहुसंख्य मागासवर्गियांना जाग येवू नये व दलित-ओबिसींची युती होवू नये हा कुटील डाव यामागे होता. या राजिनाम्यामुळे नेमाव्या लागलेल्या कालेलकर आयोगाचा अहवाल नेहरू सरकारने बासनात बांधून ठेवला. तेव्हा लोकसभेची सत्ताही ऊच्चवर्णिय खासदारांच्या हातात होती. आणिबाणीनंतरच्या १९७७ च्या निवडणुकीत मागास जातीचे खासदार मोठ्या प्रमाणात होते. आणि त्यामुळे सत्तेचा समतोल सामाजिक न्यायाच्या बाजूने झुकला व मंडल आयोगाची स्थापना झाली.
जातीअंताची लढाई
’सत्ता’ म्हणजे काहीतरी तुच्छ, त्याज्ज, वाईट प्रलोभन आहे. असा एक प्रचार ऊच्चवर्णियांकडील अमर्याद सत्तेबाबत मागासवर्गियांनी प्रश्न विचारायला सुरूवात केल्यानंतर सुरू झाला. राजकारणाचे उद्दीष्टच मुळी ’सत्ता’ संपादन करून स्वत:ला अभिप्रेत असणारा समाज विकासाचा कार्यक्रम अंमलात आणणे. ’जाती विकासातूच जातींचा नाश होईल’ हे डॉ. राम मनोहर लोहियांचे वचन मार्मिक आहे. हा सत्ता संपादनाचा मार्ग लोकशाही निवडणुकींचा असल्यामुळे, सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे बहुजन महासंघाच्यासत्ता हस्तगत करण्याच्या कार्यक्रमामध्ये सर्व जातीसमूहांना ’बहुजन’ अस्मिता स्विकारणे ही सत्ता संपादनातील पूर्व अट आहे.
अद्यापही लोकशाही रुजली नाही
शुद्रादीशूद्रांना वेगवेगळ्या पध्दतीने अपमानीत करून त्यांचा तेजोभंग करीत रहाणे हा ब्राह्मणी धर्मसंस्क्रुतीने हजारो वर्षांपासून अंमलात आणलेला डाव आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोघांच्या आग्रहामुळे भारतामध्ये प्रौढ मतदानाचा अधिकार मान्य झाला व लोकशाहीच्य दृष्टीने सर्वात महत्वाचे पाऊल पडले. त्या वेळेपासून येथील सुशिक्षीत वर्ग (जो ९५% पेक्षा जास्त ऊच्चवर्णिय आहे.) या अडाणी, अशिक्षीत, गरीब व मागास जनतेला मतदानाचा अधिकार देणे ही लोकशाही नसून झुंडशाही आहे असेचम्हणत आला आहे. आणि त्यामुळेच या लोकशाहीमध्ये हळूहळू शुद्रादीशूद्र जागृत होईल; त्याप्रमाणात सत्ता त्यांच्याकडे जाईल हा पोटसूळ इथल्या ब्राह्मणी व उच्चवर्णीय अभिजनात उठतो. जर निवडणुकीतील सारे व्यवहार कुणी बारकाईने पाहिले तर याबद्धलची बेपर्वाई सर्वात जास्त हा सुशिक्षीत अभिजनवर्गच दाखवतो. म. फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रुजविलेल्या या मुल्यांच्यामुळे आज जी काही लोकशाही आहे ती दिसते आणि या ब्राह्मणी षढयंत्राची ताकद जबरदस्त की शुद्रादीशूद्रांमधील मंडळीदेखील हाच प्रचार करताना दिसतात. या ब्राह्मणी षढयंत्राची आणखी एक झलक पहाण्यासारखी आहे. मुलायमसिंग यादव व लालूप्रसाद यादव हे यादवांचे नेते, कांशीराम-रामविलास पास्वान हे दलितांचे नेते, गोपिनाथ मुंढे हे वंजा-यांचे नेते, पण नरसिंहापासून ज्योतिबसूंपर्यंत ते एन.डी.तिवारींपासून ते प्रमोद महाजनांपर्यंतचे ब्राह्मण मात्र सा-या जनतेचे नेते असतात! त्यांच्या बाबतीत “हेसाडेतीन टक्केवाले” असा साधा उल्लेख देखील ’तुम्ही अत्यंत हीन जातीयवादी आहात’ हे सिध्द करावयास पुरेसे आहे.
“वेद वाक्यम प्रमाणम” च्या धर्तिवरील प्रश्न
४) आंबेडकरवाद आणि बहुजनवाद यांच्यातील विरोधी जाणारे मुद्दे कोणते?
८) बहुजन महासंघाच्या संघटनांचा पाया जात हाच आहे की नाही? तसे नसेल तर त्यांच्या संघटनांचा पाया कोणता? ते आंबेडकरवादडत बसते काय?
१३) स्वत:ला हिंदू म्हणवणारे आंबेडकरवाद मानतील का?
१७) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनवादाचे कधी समर्थन केले होते का?
२७) बहुजनवादामुळे आंबेडकरवाद बाजूला फेकला गेला आहे का?
सर्जनशीलता विरुध्द ब्राह्मणी परंपरा
बाबासाहेबांनी त्यांच्या आधी होऊन गेलेल्या बुध्द, कबीर, फुले यांना स्वत:चे गुरू मानले. पण म्हणून काही त्यांचा प्रत्येक शब्द आणि विचारांच्या प्रामाण्यात पोथीनिष्ठांप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर अडकले नाहीत. त्यांनी त्यांच्या पूर्वसुरींच्या विचारांचा सर्जनशिलतेने विकास करून स्वत:चे सामर्थ्यवान तत्वज्ञान मांडले. हजारो वर्षांपूर्वी लिहीलेल्या वेदांमधील मजकूराचे शब्दप्रामाण्य ब्राह्मणी धर्म संस्कृती मानते आणि त्याचे एक कारण त्यांचे माणसाचे प्रतिमान हे अचल आहे. त्याविरूध्द फुले-आंबेडकरी विचार ’माणसाचा सतत विकास होत रहाणार आहे’ अशी भुमिका मांडतात.
परिवर्तन व निर्भयता
फुले-आंबेडकरी तत्वज्ञानाच्या पायावर परिवर्तनाची चळवळ उभारताना काळाच्या संदर्भात त्यात नवनवा आशय भरावा लागतो. त्यासाठी यथास्थितीवाद्यांशी टक्कर देण्याचे धैर्य लागते.
आज तथाकथित आंबेडकरी चळवळ आंबेडकरांना बौध्दांपुरती मर्यादीत करीत आहे; याची परखड जाणिव भारिप बहुजन महासंघ सा-यांना करून देत आहे. आणि या नेहमीच्या परिघाबाहेरील जनतेला संघटीत करत असता; तिच्या आशा-आकांक्षा व सांस्कृतिक परंपरेला जिवंत हूंकार देण्याचा प्रयत्न करीत आहे. बाबासाहेबांनी ’शासनकर्ती जमात बना’ असा जो संदेश दिला; त्याचा ’बौध्दांनो शासनकर्ती जमात बना आणि त्यासाठी कुणाशिही तडजोड करा’ असा संकुचित अर्थ नव्हता. सर्व शोषित घटकांना म्हणजे दलित, आदिवासी, ओबिसी व मुसलमान यांना एकत्रित आणून त्यांची शासनकर्ती जमात बनवा असाच त्याचा अर्थ घेणे तर्कसुसंगत आहे.
बहुजन विद्यार्थ्यांबद्दल तुच्छभाव असलेल्या ’पंतोजी’ छापाचे प्रश्न
७) जातीव्यवस्थेत कोणत्याही दोन जाती समान नसताना स्वत:ला ’बहुजन’ म्हणविणा-या जाती एकत्र कशा रहातील?
१२) बहुजन महासंघातील जाती स्वत:ला हिंदू समजतात की नाही?
१३) स्वत:ला हिंदू म्हणवणारे आंबेडकरवाद मानतील का?
१४) बहुजन बौध्द होण्यास तयार आहेत का?
१५) डॉ. आंबेडकर म्हणाले होते,” सारा भारत बौध्दमय करीन’ हे बहुजनांना मान्य आहे का?
१६) त्यांना हे मान्य नसेल तर आंबेडकरवाद विरोधी आहेत असे मानायचे की नाही?
२२) बहुजन महासंघातील माळी, साळी, धोबी, सोनार, इत्यादी जाती ह्या मातंग, चर्मकार, वडार, फासेफारधी, यांना बरोबरीने कधी वागवणे शक्य आहे का?
२३) बहुजनांनी एका दलिताला नेता मानले किंवा नेतृत्व स्विकारले हे कितपत बरोबर आहे?
तेजोभंग करणे ही ब्राह्मणी परंपरा आहे
ज्या समाजाच्या परिवर्तनाचे आव्हान आपल्यामुळे आहे त्याच्या मर्याद आणि बेड्या तोडून टाकण्यास उद्युक्त करण्याऐवजी ’तू तोडूच शकणार नाहीस’ अशी भूमिका घेवून त्याची मानहानी करणारे हे प्रश्न आहेत.
हिंदू समाजातील अंतर्विरोध
ब्राह्मणी धर्मसंस्कृतीच्या कावेबाजपणाचे आणखी एक मर्मभेदी उदाहरण म्हणजे स्वत:चे विषमतेचे विष त्यांनी सा-या बहुजन समाजाच्या गळी उतरविले. समानतेची व लोकशाहीची परंपरा असलेल्या विविध लोकधर्म पंथांच्या (बौध्द, जैन, शाक्त, लिंगायत, वारकरी, सूफी, इ.) लोकांना त्यांच्या समाजजीवनातही सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेच्या उतरंडी रचावयास लावल्या. डॉ. लोहियांच्या म्हणण्याप्रमाणे ’उपरको चाटो और नीचेको लाटो’ ही शिकवण आपण ब्राह्मणी संस्कारांतून घेतली. ही उतरंड जशी शूद्रांतील अठरापगड जातींमध्ये आहे, तशीच ती दलीत जातींमध्येही आहे. या सा-या उतरंडीतील वरच्या थराला, ते या ब्राह्मणी संस्कारांचे बळी आहेत म्हणून आपण त्यांना हिंदूत्ववाद्यांच्या (ब्राह्मणी) गोटात ढकलले तर आपल्याला क्रांती करण्यासाठी सर्वात खालच्या थरामधील केवळ आदिवासी स्त्रियाच उतरतील. ब्राह्मणी धर्मसंस्कृतिला नेमके हेच व्हावयास हवे आहे.
रेखा ठाकूर
मुंबई
—————————————————————————————