पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रभाग क्र. ११ च्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या त्रुटी आणि चुका आढळल्याने, वंचित बहुजन युवक आघाडी, पिंपरी चिंचवड शहर यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ही प्रारूप मतदार यादी तातडीने दुरुस्त करून नव्याने अधिप्रमाणित व प्रसिद्ध करण्याची मागणी त्यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
यादीतील गंभीर त्रुटी काय?
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने २०/११/२०२५ रोजी प्रभाग क्र. ११ ची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. वंचित बहुजन युवक आघाडीच्यावतीने करण्यात आलेल्या निवेदनात, या यादीमध्ये खालीलप्रमाणे गंभीर स्वरूपाच्या त्रुटी निदर्शनास आल्या आहेत ―
१) यादीमध्ये अनेक मतदारांची नावे दुबार (दोनदा) समाविष्ट करण्यात आली आहेत.
२) अनेक मतदार मयत (मृत) असूनही त्यांची नावे यादीतून वगळण्यात आलेली नाहीत.
३) एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात, उदाहरणार्थ प्रभाग क्र. १ मधील मतदारांची नावे प्रभाग क्र. ११ मध्ये आणि ११ मधील नावे इतर प्रभागात समाविष्ट झाल्याचे आढळून आले आहे.
४) यादीमध्ये पुरुष मतदारांच्या नावापुढे महिला मतदारांचे छायाचित्र आणि महिला मतदारांच्या नावापुढे पुरुष मतदारांचे छायाचित्र अशी मोठी विसंगती दिसून आली आहे.
तसेच, मतदारांची नावे वेगळी व छायाचित्रे वेगळी असण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.वंचित बहुजन युवक आघाडीने या चुकांना ‘अत्यंत गंभीर स्वरूपाची’ संबोधले असून, ही त्रुटी ‘स्वच्छ व पारदर्शक’ नसून, बनावट कागदपत्रांच्या आधारे आणि लोकसेवकाला चुकीची माहिती देऊन नावे समाविष्ट केल्याची शक्यता वर्तवली आहे.
“भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेला अमूल्य असा मतदान करण्याचा अधिकार या प्रारूप मतदार यादीतील त्रुटी व चुकांमुळे स्थानिक मतदारांना हिरावून घेण्याची भीती आहे. ही बाब लोकशाही मूल्यांना घातक आहे.”
सर्व प्रभागांची चौकशी आवश्यक -निवेदनात पुढे नमूद केले आहे की, प्रभाग क्र. ११ मध्ये आढळून आलेल्या या चुका व त्रुटी केवळ याच प्रभागात नसून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतर सर्वच प्रभागांमध्ये देखील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेची पुनरावृत्ती आणि तपासणी आवश्यक आहे.
निवेदनाच्या माध्यमातून, वंचित बहुजन युवक आघाडीने मागणी केली आहे की, दिनांक २०/११/२०२५ रोजीची प्रारूप मतदार यादी रद्द करून, त्यातील सर्व त्रुटी व चुका तात्काळ दुरुस्त कराव्यात आणि नव्याने, स्वच्छ व पारदर्शक पद्धतीने तयार केलेली दुबार प्रारूप मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करावी.





