अहिल्यानगर : नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील सर्व्हे नं. २६९ मधील महार वतनाच्या जागेवर गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून दडपशाही करून अवैध उत्खनन सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. संबंधित जागेचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही या जागेत दिवस-रात्र अवैध गौण खनिज उत्खनन सुरू असल्याची तक्रार स्थानिकांनी प्रशासनाकडे अनेकदा केली, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
जागेचे मालक हरिभाऊ माधव भिंगारदिवे यांनी उत्खननास विरोध केला असता त्यांच्या कुटुंबीयांवरही गावगुंडांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. पोलिस आणि महसूल प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही कारवाई न झाल्याने आज भिंगारदिवे कुटुंबीयांसह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर तहसीलदारांना निवेदन सादर केले.
Mumbai Constitution Honor Meeting : संविधान सन्मान महासभेची मुंबईत जय्यत तयारी
निवेदनात अवैध उत्खनन तात्काळ थांबवून संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा तहसीलदारांच्या कार्यालयाबाहेर जनआंदोलन उभारण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी दिला.
यावेळी योगेश साठे, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, जे. डी. शिरसाठ, शहराध्यक्ष हनीफ शेख, प्रवीण ओरे, राजीव भिंगारदिवे, योगेश क्षीरसागर, हरिभाऊ भिंगारदिवे, मनोज साळवे, आकाश भिंगारदिवे, दिलीप भिंगारदिवे, मंजाबापू भिंगारदिवे, सूरज भिंगारदिवे, सचिन भिंगारदिवे, इम्रान शेख, प्रवीण जाधव, सागर दातीर आदींसह पदाधिकारी आणि कुटुंबीय उपस्थित होते.






