अकोला : येथे घडलेल्या भीषण दुहेरी हत्याकांड प्रकरणी मृतक श्रीराम वानखडे आणि दीपक वानखडे यांच्या कुटुंबीयांनी आज वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर यांची यशवंत भवन येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी घटनेविषयीची सविस्तर माहिती दिली, तसेच मुख्य सूत्रधारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
या भेटीप्रसंगी प्रमोद वानखडे, भीमराव वानखडे, शंकरराव इंगळे, रुपराव पांडुजी वानखडे आदी उपस्थित होते. कुटुंबीयांनी सुजात आंबेडकर यांच्याकडे आपली व्यथा मांडताना पोलिस तपासात झालेल्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि न्याय मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणात पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.
सुजात आंबेडकर यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली असून, न्यायासाठी वानखडे कुटुंबियांसोबत उभे राहण्याचा विश्वास त्यांनी दिला. तसेच या दुहेरी हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पक्षाच्या वतीने आवश्यक ती पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.