पुणे : “भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची” ही गर्जना करत वंचित बहुजन महिला आघाडी, पुणे शहर यांच्यावतीने आज २५ डिसेंबर रोजी ‘मनुस्मृती दहन दिन’ आणि ‘भारतीय स्त्री मुक्ती परिषद’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवार पेठ येथील जनसागर हॉलमध्ये पार पडलेल्या या परिषदेत महिलांच्या हक्क आणि अधिकारांबाबत मंथन करण्यात आले.
या परिषदेला मुख्य मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजली आंबेडकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता चव्हाण यांनी भूषवले.

यावेळी मंचावर राज्य सदस्य निर्मला वनशिव, रोहिणी टेकाळे, पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, माहिला महासचिव ऍड. रेखा चौरे, महासचिव सारिका फडतरे, युवा आघाडीचे शहराध्यक्ष सागर आल्हाट, माथाडी ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष विशाल कसबे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चैतन्य इंगळे, जेष्ठ नेते वसंत साळवे आदी उपस्थित होते.
परिषदेत पुणे शहर आणि जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. मनुस्मृती दहन दिनाचे औचित्य साधून विषमतेचा निषेध करण्यात आला आणि समतेचा विचार घराघरात पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या कार्यक्रमातील विचार केवळ व्यासपीठापुरते मर्यादित न राहता, ते प्रत्येक घरापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. असे परखड प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी केले.
समाजात आजही आंतरजातीय प्रेमातून किंवा विवाहातून होणाऱ्या हत्या या केवळ गुन्हे नसून ती ‘जातीय अहंकाराची’ परिणीती आहे.

पालकांना आपल्या मुलांच्या निर्णयाशी असहमती असू शकते, परंतु कोणाच्याही जातीचा किंवा धर्माचा द्वेष करून त्याची हत्या करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
सक्षम ताटे प्रकरणात तो ‘बौद्ध’ आहे या कारणावरून झालेली हत्या आणि त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष ही गंभीर बाब आहे. गेल्या दोन वर्षांतील घटनांचा (संपदा मुंडे, सोमनाथ सूर्यवंशी, अक्षय भालेराव, सक्षम ताटे प्रकरण) आढावा घेतल्यास एक भयावह वास्तव समोर येते. पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेच्या काही स्तरांवर आजही ‘मनुस्मृतीची मानसिकता’ दिसून येते. पीडितांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावरच दडपण आणण्याचे प्रकार घडत आहेत.
हा संघर्ष केवळ एका व्यक्तीपुरता नसून व्यवस्थेत रुतलेल्या त्या मानसिकतेविरुद्ध आहे, जी विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांना दुय्यम मानते. २५ डिसेंबर हा दिवस ‘मनुस्मृती दहन दिन’ अर्थात ‘भारतीय स्त्रीमुक्ती दिन’ म्हणून साजरा करण्यामागे वंचित बहुजन आघाडीची मोठी भूमिका आहे. असे अंजली आंबेडकर यावेळी म्हणाल्या.

स्त्री गुलामगिरी विरुद्ध लढा : मनुस्मृतीने केवळ दलित किंवा बहुजनांनाच नव्हे, तर सर्वच जाती-धर्मांतील (हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, भटके विमुक्त) स्त्रियांना दुय्यम स्थान दिले आहे. गावकुसाबाहेरच्या लोकांना आणि महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या त्या जुनाट विचारांची गुलामगिरी झुगारून देण्याचा हा संकल्प आहे.
कोथरूड प्रकरण आणि कायदेशीर लढा :
कोथरूड प्रकरणात ऍड. अरविंद तायडे आणि त्यांच्या वकिलांच्या टीमने दाखवलेली चिकाटी ही अन्यायाविरुद्धच्या लढ्याचे प्रतीक आहे.जेव्हा वंचित समूह न्यायासाठी आवाज उठवतो, तेव्हा त्यांच्यावरच गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि प्रशासनाकडून केला जातो. ही ‘मनुवादी’ वृत्ती आहे. मनुवाद गाडणे ही केवळ एका संघटनेची जबाबदारी नसून, ती एक सामूहिक सामाजिक कृती व्हायला हवी. याच कार्यक्रमात पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष अनिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.

यावेळी कोमल शेलार, दौलत जहाँ शेख, प्रतिमा कांबळे, स्वीटी कांबळे, भारती ताई वांजळे, दिपा सोनवणे, छाया बनसोडे, आशा पठारे, विजया ओव्हाळ, ऍड. कुंदा दवे, ऍड किरण कदम वैशाली गायकवाड, प्राची साळवे पुणे शहर माहिला आघाडी उपस्थित होते.
यावेळी ज्योती शिंदे, भारती वांजळे, दिपा सोनवणे, दौलतजहाँ शेख, प्रज्ञा ओव्हाळ, कोमल शेलार यांच्यासह प्रभाग अध्यक्षा अस्मिता कांबळे, मनिषा ओव्हाळ, सारिका भोसले आणि इतर अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ऍड रेखा चौरे यांनी केले तर सूत्रसंचालन त्रिशाली गायकवाड, प्रतिभा कांबळे, वर्षा जाधव यांनी केले. कार्यक्रमात उषा भिंगारे, ज्योती शिंदे, माया कांबळे, सुनम शिंदे, विजया ओव्हाळ, दिपा सोनवणे, ठरावाचे वाचन केले.





