Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home सामाजिक

आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 14, 2021
in सामाजिक
0
आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स
       

२८ ऑक्टोबर १९५१ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची लुधियाना येथे एक जाहीर सभा झाली. दोन-तीन महिन्यांत येऊ घातलेल्या विधानसभा आणि मध्यवर्ती संसदेकरिता होणाऱ्या निवडणुकांची ती प्रचारसभा होती. या निवडणुकीत योग्य उमेदवारांना निवडून द्यावे यासाठी बाबासाहेबांनी भाषण केले. त्यात बाबासाहेब म्हणाले की, “जर आपले सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत असले, तर ते आपल्या हितासाठी लढा देतील आणि आपली दुःखे दूर करतील. फक्त तेव्हाच आपल्या मुलांना योग्य असे शिक्षण मिळेल; फक्त तेव्हाच आपले दारिद्र्य दूर होऊ शकेल आणि फक्त तेव्हाच जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आपणाला बरोबरीचा वाटा मिळेल.” या विधानात बाबासाहेबांनी ‘आपले’ हा शब्द पीडित, वंचित आणि मानवी हक्क नाकारलेले सर्व समूह यांच्यासाठी वापरला आहे. अशा समूहांच्या हिताचा विचार करणारे, त्यांच्यासाठी लढणारे प्रतिनिधी निवडून गेले पाहिजेत असे बाबासाहेब म्हणतात. लोकप्रतिनिधीला जनतेच्या प्रश्नांची जाण असली पाहिजे, ते प्रश्न योग्य रितीने मांडता आले पाहिजेत आणि त्यासाठी त्याला संसदीय कार्यपद्धतीची, संसदीय कामकाजाची माहिती असली पाहिजे. याकरिता त्या व्यक्तीला प्रशिक्षण दिले पाहिजे. असे प्रशिक्षण देणारी कोणतीही संस्था भारतात अस्तित्वातच नव्हती. ही उणीव दूर करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी १ जुलै १९५६ रोजी‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स’ नावाची संस्था मुंबईत सुरु केली. नंतर तिला ‘आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स’म्हणू लागले.

राजकारणात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला राजकारणाबरोबरच प्रशासनिक कामकाजाच्या स्वरूपाचीही इत्यंभूत माहिती असेल तर, ती जनतेचे प्रश्न सक्षमतेने सोडवू शकते आणि अशा व्यक्तीकडे जनता अभ्यासूराजकारणी म्हणूनही पाहते. राजकारणातील व्यक्ती अभ्यासू व जागरूक असणे ही संसदीय प्रणालीची पूर्वअट असायला पाहिजे. त्यासाठी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीच उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी बाबासाहेबांनी ह्या संस्थेची स्थापना केली होती. राजकारणातील व्यक्तीला जनहिताची जाणीव असायला हवी. तिच्यासमोर काही ध्येय आणि उद्दिष्ट असायला हवीत. ह्या उद्दिष्ट्यांच्या पूर्तीत जात-पात-धर्म-लिंगभेद यांचा अडसर येता कामा नये. ती सार्वत्रिक, समताधिष्ठित, व्यक्तिस्वातंत्र्यास प्राधान्य देणारी व बहुजनांच्या कल्याणाची असावीत, यावर बाबासाहेबांचा सुरुवातीपासूनच कटाक्ष होता.

प्रारंभीच्या काळात बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा निवडणूक जाहीरनामा बघितला तर याचा प्रत्यय येतो. १९५१ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शेकाफेचा जाहीरनामा ‘जनता’ या पत्रात प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात ठळकपणे नमूद केलेले होते की, ‘फेडरेशन समतेचा पुरस्कार करील. जेथे समानता लाथाडली जाते तेथे फेडरेशन समानतेच्या हक्कांसाठी लढेल. प्रत्येक भारतीयाला धार्मिक, आर्थिक व राजकीय मतप्रदर्शनाचा व वागण्याचा हक्क राहील व त्यांच्यावर गदा न येईल याबद्दल फेडरेशन दक्ष राहील. प्रत्येक भारतीयाला आपल्या उत्कर्षासाठी समान संधी देण्याचा व ज्यांना ती कधी मिळाली नाही त्यांना ती प्रथम देण्याचा मार्ग अवलंबिला जातो की नाही यावर फेडरेशन कटाक्ष ठेवील. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांचा फेडरेशन संपूर्ण पुरस्कार करील. एवढेच नव्हे, तर माणसामाणसांतील वर्ग, वर्गांमधील व राष्ट्राराष्ट्रातील असलेले हेवेदावे व होणारा अमानुष छळ यांचा बिमोड करण्याचे आटोकाट प्रयत्न फेडरेशन करील.’ या जाहीरनाम्यातून बाबासाहेबांचे राजकीय उद्दिष्ट स्पष्ट होते. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ध्येयनिष्ठ राजकारणी व्यक्ती घडविण्याची गरज होती, त्यासाठीही ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स’ सुरु करणे आवश्यक असल्याचे बाबासाहेबांना वाटले असावे.

सर्व आंदोलने, चळवळी विधानसभेच्या किंवा संसदेच्या दारापर्यंत पोहचतात मात्र कायदे आणि त्यांच्या अंमलबजावणीचे आदेश विधानसभेच्या / संसदेच्या आत बनवले जातात. तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय चळवळीला गत्यंतर नाही. त्यासाठी राजकीय प्रतिनिधित्व ही अपरिहार्य बाब आहे. मात्र हे प्रतिनिधित्व कुणाचे अंकित असता कामा नये. त्या प्रतिनिधीला स्वत्वाचे भान असले पाहिजे. दुसऱ्याच्या मेहरबानीवर प्रतिनिधित्व मिळालेला व्यक्ती त्याच्या  धन्याच्या विरुद्ध बोलू शकत नसल्याचे बाबासाहेबांनी लुधियानाच्या भाषणात म्हटले होते.

भारतीय समाजमन जात-पात आणि विषमतेने बरबटलेले असल्याचे बाबासाहेबांनी वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेले आहे. या विषमतेमुळे भारतीय समाजाचे अतोनात नुकसान झालेले आहे. ही विषमता राजकारणातही भिनलेली आहे आणि त्यामुळे उच्च सामाजिक मूल्ये भारतीय जनमानसात रुजत नाहीत. २०मे १९५६ रोजी ‘भारतीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर बाबासाहेबांनी ‘व्हॉईस ऑफ अमेरिका’ या केंद्रावर भाषण दिले होते. त्यात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की,‘.. सामाजिक श्रेष्ठ ध्येये भारतीय समाजात आहेत काय? भारतीय समाज हा व्यक्तींनी बनलेला नाही, तर निरनिराळ्या जातींनी बनलेला आहे. या जाती परस्परांना उच्च व नीच मानतात. या उच्च-नीच प्रवृत्तीमुळेच भारतीय समाजात उच्च सामाजिक ध्येये रुजू शकली नाहीत. सर्व सामाजिक व्यवहार भारतीय लोक आपल्या जातीच्या सीमेतच करू शकतात. त्या बाहेर नाही ! एवढेच नव्हे, तर निवडणुकीत ज्या जातीचे उमेदवार असतात, त्याच जातीचे मतदार त्यांना मते देतात…जातिभेद हे लोकशाही नष्ट करणाऱ्या अग्निशिखा आहेत. त्या विझवल्या तरच लोकशाही चिरायू होईल.’ राजकारणातील ही विषमता नष्ट करू शकतील अशाप्रशिक्षित राजकारण्यांची भारतीय समाजाला गरज असल्याचे बाबासाहेबांचे मत होते.

अशा अनेकविध बाबींचा विचार करून बाबासाहेबांनी मुंबई येथे ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स’ हे स्कूल सुरु केले.अशा पद्धतीचे हे भारतातील एकमेव स्कूल होते. बाबासाहेब स्वतः या स्कूलचे डायरेक्टर होते.त्यांच्यासोबत अनेक वर्ष कार्यरत असलेले शां.शं. रेगे यांची त्यांनी रजिस्ट्रारपदी नियुक्ती केली होती. या स्कूलसाठी तितक्याच ताकदीचे प्राचार्य असावेत, अशी त्यांची इच्छा होती. या स्कूलचा प्राचार्य या विषयात प्रवीण असावा. त्याला उत्तम रितीने व्याख्यान देता आले पाहिजे. त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक असावे, अशा अपेक्षा त्यांनी रजिस्ट्रार रेगे यांच्याकडे व्यक्त केल्या होत्या. प्राचार्यपदी कोणाची नियुक्ती करावी, याचा ते शोध घेत होते. परंतु, त्याचदरम्यान धम्मदीक्षेच्या कार्यक्रमास प्राधान्य असल्याने या स्कूलच्या प्राचार्यांची निवड तातडीने होऊ शकली नाही व नंतरही हे पद शेवटपर्यंत रिक्तच राहिले.

या स्कूलची पहिली बॅच १ जुलै १९५६ ते मार्च १९५७ या कालावधीत प्रशिक्षित झाली. याबॅचमध्ये १५ विद्यार्थी होते. या स्कूलच्या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी स्वतः तयार केला होता. त्यात वत्कृत्व, संभाषणकौशल्य, संसदीय कामकाजाचा तपशील अशा अनेक बाबींचा समावेश होता. पहिल्या बॅचला शिकविण्यासाठी बाबासाहेब स्वतः जाणार होते. दि. १० डिसेंबर १९५६ रोजी ‘संभाषण कौशल्य’ या विषयावर बाबासाहेबांचे व्याख्यान ठरले होते, मात्र चार दिवस आधीच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. या स्कूलबाबत बाबासाहेबांनी खूप स्वप्ने पाहिली होती. परंतु त्यांच्या पश्चात अल्पावधीतच हे स्कूल बंद पडले.

बाबासाहेब त्यांच्या हयातीत जे प्रकल्प पूर्ण करू शकले नाहीत अशा प्रकल्पांवरकाम करण्यासाठी विचारवंतांचा अभ्यासगट तयार करून त्या दिशेने पावले उचलली पाहिजेत. त्यांनी आराखडा तयार केलेले मात्र अपूर्ण राहिलेले ग्रंथलेखन आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या राजकारणाबरोबरच उच्च सामाजिक ध्येये साध्य करण्यासाठी अशा प्रयत्नांची नितांत गरज आहे, ‘आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स’ हा ही त्याचाच एक भाग झाला तर त्यांच्या जयंतीनिमित्ताने ही कृतिशील आदरांजली ठरेल !

देवेंद्र उबाळे, इगतपुरी


       
Tags: ambedkarscoolbabasahebambedkardevendraubalepolitics
Previous Post

बाबासाहेब आणि सिद्धार्थ महाविद्यालय

Next Post

प्रबुद्ध समाजासाठी एक व्हा – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Next Post

प्रबुद्ध समाजासाठी एक व्हा - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुण्यात SRA विरोधी वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा’ यशस्वी; प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य!
बातमी

पुण्यात SRA विरोधी वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा’ यशस्वी; प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य!

by mosami kewat
October 27, 2025
0

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मोर्चा संपन्न! पुणे : महायुती सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) भ्रष्ट, भोंगळ आणि बिल्डरधार्जिण्या...

Read moreDetails
घाटकोपरमध्ये RSS च्या पथसंचलनावरून नवा वाद; आंबेडकरी कार्यकर्त्यांचे पंतनगर पोलिसांना पाच प्रश्न

घाटकोपरमध्ये RSS च्या पथसंचलनावरून नवा वाद; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना प्रश्न

October 27, 2025
“नव”उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय ?

“नव”उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय ?

October 27, 2025
वंचितांच्या राजकीय चळवळीचा दस्तऐवज : ज. वि. पवार यांचे प्रतिपादन

वंचितांच्या राजकीय चळवळीचा दस्तऐवज : ज. वि. पवार यांचे प्रतिपादन

October 27, 2025
एसआरए गैरकारभाराविरोधात पुण्यात जनआंदोलन; प्रकाश आंबेडकरांच्या मोर्चातील कार्यकर्त्यांकडून रुग्णवाहिकेला तात्काळ मार्ग

एसआरए गैरकारभाराविरोधात पुण्यात जनआंदोलन; प्रकाश आंबेडकरांच्या मोर्चातील कार्यकर्त्यांकडून रुग्णवाहिकेला तात्काळ मार्ग

October 27, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home