संजय राऊत यांना वंचितने केले आवाहन !
मुंबई : संजय राऊत यांनी काय खोटे बोललो हे स्पष्ट करा, असे म्हटल्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना एक्स हॅंडलवरुन पोस्ट करत आवाहन केले आहे. सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, जर तुम्ही खोटे बोलत नसाल तर येत्या २४ तासांत या १५ जागा घोषित करा. जर तुम्ही त्या १५ जागा २४ तासांत घोषित करु शकला नाही तर तुम्ही माध्यमांना दिलेली माहिती खोटी आणि अर्धवट होती हे सिद्ध होते असेही म्हटले आहे.
सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे की, संजय राऊत यांनी माध्यमांसमोर एक वक्तव्य केलं आहे. त्यात ते म्हणताहेत की, ते खोटे बोलत नाहीत. मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात माध्यमांना माहिती देताना केवळ वंचित बहुजन आघाडीमुळे हे जागावाटप रखडलेय की काय अशी माहिती दिली जाते. मात्र, प्रत्यक्षात १५ जांगावर या तिन्ही पक्षात समझोता झालेला नाही. या १५ जागा अद्याप अनसेटल आहेत. त्यापैकी १० जांगावर काँग्रेस आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. तर ५ जागांवर शिवसेना, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. अशा १५ जागांचं वाटप अद्याप आपण करु शकला नाही. पण, याबाबतीत एकही शब्द काढला जात नाही.
मोकळे यांनी म्हटले आहे की, माध्यमांशी बोलताना वंचितमुळेच जागा वाटप रखडले असल्याचे चित्र तयार केले जात असून, याचं खापर वंचितच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे तो थांबला पाहिजे. जर तुम्ही खोटे बोलत नसाल, तर येत्या २४ तासांत या १५ जागा घोषित करा. जर तुम्ही त्या १५ जागा २४ तासांत घोषित करु शकला नाही तर तुम्ही माध्यमांना दिलेली माहिती खोटी आणि अर्धवट होती हे सिद्ध होते. तसेच, आपण 15 जागांचा वाद मिटवावा अशी सुरुवातीपासून वंचितची भूमिका राहिली आहे, त्याबाबतीत आम्ही बोलत आलो आहोत. मात्र, माध्यमांचा वापर करुन आम्हालाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. तो थांबवण्यात यावा असे आम्ही आवाहन करतो, असेही मोकळे यांनी म्हटले आहे.