वसई-विरार : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपावरून अभिनव परब यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. या वक्तव्याचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीच्या वसई-विरार शहरातील कार्यकर्त्यांसह महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अभिनव परब यांच्या कार्यालयाला काळे फासले.
सुजात आंबेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अभिनव परब यांनी स्वतः कार्यालयात येऊन जाहीर माफी मागावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
तसेच, वालीव पोलीस ठाण्यात अभिनव परब यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे.
अभिनव परब यांना अटक करून त्यांनी जाहीर माफी मागेपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
सुजात आंबेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी, वसई-विरार शहर व महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.





