जोपर्यंत देशातील जातीवाद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणारच : सुजात आंबेडकर
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने फुले, शाहू, आंबेडकरवादी ‘जेन झी’ (Gen Z) पिढीशी संवाद साधण्यासाठी जयभीम जेन झी या टाऊनहॉल मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील संत एकनाथ रंगमंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
सुजात आंबेडकर म्हणाले की, काही दिवसांपूर्वी दिल्लीत GenZ आंदोलन झाले होते. मी मानतो की, ते आंदोलन खूप गरजेचे होते. कारण GenZ ही रस्त्यावर उतरत आहे, राजकीय होत आहे आणि राजकीय भूमिका घेऊन स्वतःच्या न्याय- हक्कासाठी लढत आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. २०१४ नंतर जे काही देशात चाललं आहे. त्यामुळे GenZ ने राजकीय होऊन रस्त्यावर येण्याची खरचं गरज होती. GenZ आंदोलनानंतर भारतात ‘आरक्षण हटाव आंदोलन’ झाले. मोठ्या प्रमाणात जातीवाचक शिवीगळ सुरू झाली. आरक्षणविरोधी भाषणे मोठी प्रमाणात होत आहेत. त्यामुळे फुले – शाहू – आंबेडकरवादी GenZ जे पहिल्या आंदोलनात सहभागी होती त्यांना असे वाटायला लागले की, हाच समाजाचा खरा चेहरा आहे का ? पण, त्या फुले – शाहू – आंबेडकरवादी GenZ सोबत आम्ही आहोत आणि खांद्याला खांदा देऊन तुमच्यासाठी लढू हे सांगण्यासाठी जय भीम GenZ हा कार्यक्रम घेतला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हल्दवाणी येथील रॅली नंतर श्रीराम सेनेकडून शुद्धीकरण करण्यात आले. परंतु यानंतर काँग्रेस सदस्यांनी यावर मौन साधले आणि खरगे नाराज झाले, यावरही सुजात आंबेडकर यांनी भाष्य करत आजही जातीवादी मानसिकता एका राष्ट्रीय नेत्याला सुद्धा सोडत नाही हे दाखवून दिले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती गवई यांच्यावर बूट फेकून मारल्यानंतर त्यांचा गळ्यात मडके घातलेला AI फोटो पोस्ट करण्यात आला, यावरही आंबेडकर यांनी लक्ष वेधले. अशा अनेक विषमतावादी बाबी तरुणाईसमोर मांडून त्यांनी आजही आरक्षणाची गरज का आहे? हे उपस्थित Gen-Z तरुणाईला वेगवेगळ्या फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून पटवून दिले. त्यांनी आरक्षणविरोधी व्हिडिओज, पोस्टर आणि सोशल मीडिया पोस्ट दाखवत आरक्षण हटाव आंदोलन म्हणजे मुर्खपणा असल्याचेही सांगितले.
जोपर्यंत या देशातील जातीवाद संपत नाही, तोपर्यंत आम्ही आरक्षण सोडत नसतो. काय करायचं ते करून घ्या. आज आपण एकटे नाही आहोत. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा नारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. त्याच नाऱ्याला घेऊन पुढे जाऊ आणि जातीवाद्यांच्या छाताडावर उभे राहून आमचा संघर्ष उभा करू.
जयभीम Gen- Z हा विशेष कार्यक्रम औरंगाबाद येथे असल्याने या कार्यक्रमात उपस्थित तरुणाने शहराचे नामांतर या विषयावर सवाल करत विचारले की, छत्रपती संभाजी नगरमध्ये आहोत. तरीही, आपण आणि आपल्या पक्षाचे सदस्य ‘छत्रपती संभाजीनगर’चा उल्लेख ‘औरंगाबाद’ असा का करता? यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान होत नाही का?
यावर सुजात आंबेडकर यांनी लक्ष वेधताना त्यांनी म्हटले की, जर नामांतर करायचे असेल तर पुणे शहराचे नाव छत्रपती संभाजी महाराज नगर करा. पण, हे नाव पुण्यातील ब्राह्मण्यवाद्यांना पचेल का? हाही मोठा प्रश्न आहे.
आजच्या डिजिटल युगात ‘GenZ’ या नव्या पिढीचे प्रश्न, त्यांचे विचार आणि राजकीय दृष्टिकोन पारंपरिक राजकारणापेक्षा वेगळा आहे. याच युवा पिढीला आंबेडकरी विचारसरणी आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याशी जोडणे, हा या ‘टाऊनहॉल’चा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमात सुजात आंबेडकर यांनी तरुणांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘Jai Bhim Gen Z’ कार्यक्रमात आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांना आदरांजली वाहण्यात आली. साहिल वाकोडेच्या संस्थानिक हत्येनंतर देशभर त्याचे चारित्र्य हनन कसे करण्यात आले? मृत्यूनंतर त्याची अवहेलना कशी करण्यात आली, याविषयी देखील भाष्य केले.
वेगवेगळ्या तरुण-तरुणींनी यावेळी सुजात आंबेडकर यांना थेट प्रश्न विचारेल आणि त्यांनीही त्या प्रश्नांची रोखठोक उत्तरे दिली. औरंगाबादमधील या टाऊनहॉलमुळे मराठवाड्यातील युवा वर्गात मोठा उत्साह पाहायला मिळाला.





