– संजीव चांदोरकर
“ तुमच्या दोघांच्या भेटीतून आमच्यासाठी फार काही निष्पन्न झाले नाही तरी तुम्ही ( व्यक्ती म्हणून नाही तर अमेरिका आणि चीन दोन महासत्ता म्हणून ) सतत संपर्कात राहिलात, आपसात बोलत राहिलात तरी आमच्यासाठी ती पॉझिटिव्ह बातमीच असेल” !
डोनाल्ड ट्रम्प यांचा आणि ते ज्या राजकीय विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात त्या “मेक अमेरिका ग्रेट अगेन (MAGA)” यांचा चीनविरुद्धचा खुन्नस खूप जुना आहे. त्याचा पहिल्यांदा स्फोट झाला २०१६ – २०२० मध्ये ट्रम्प पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा. अमेरिकेचे जगातील एकमेव महासत्ता म्हणून स्थान डळमळीत करण्यात चीनने, गेल्या ३०-४० वर्षात, मोठी भूमिका बजावली हे त्याचे प्रमुख कारण.
मागच्या जानेवारीत अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या व्यापार युध्दात अनेक वेळा चीनला टार्गेट केले. पिंगपॉंग खेळासारखे दोन्ही देश बॉल टोलवत होते.
मागच्या फेब्रुवारीत इस्रायल अमेरिकेने इराणवर लादलेल्या युध्दात चीन इराणला अप्रत्यक्ष मदत करत आहे हे जगजाहिर आहे. या युध्दात अमेरिकेने अजून काही लाइन क्रॉस केल्या तर चक्क अमेरिका आणि चीन (आणि रशिया) एकमेकांना सशस्त्र भिडतील अशी भीती, गेल्या काही महिन्यात वारंवार व्यक्त केली गेली. ( जी आज देखील पूर्णपणे शमलेली नाही).
दोन महासत्तांमधील सशस्त्र संघर्ष त्या दोन देशांपुरता कधीच मर्यादित राहू शकत नाही. त्यामुळे तो साऱ्या जगाचा प्रश्न बनतो. त्याचे परिणाम नंतर अनेक वर्षे सर्व जगाला भोगावे लागतात.
या पार्श्वभूमीवर मागच्या आठवड्यात जिनपिंग अमेरिकेच्या औपचारिक दौऱ्यावर होते. ट्रम्प यांनी त्यांचे रेड कार्पेट स्वागत केले. गेल्या बारा महिन्यातील दोघांमधील ही तिसरी भेट. हा नंबर महत्वाचा आहे.
अमेरिका आणि चीन मधील ताणतणावांच्या जागा अनेक आहेत आणि त्या “तुझ्या गळा माझ्या गळा” घालून बुजवल्या देखील जाऊ शकत नाहीत हे नक्की.
उदा. आयात निर्यात व्यापारातील चीनच्या बाजूने असणारी मोठी तूट, त्याची प्रतिक्रिया वारंवार एकमेकांवर आयात कर अस्त्र उगारण्यात उमटणे, चीनने अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि तत्सम शेतीमाल विकत घ्यावा याला चीनने मर्यादित प्रतिसाद देणे, चीन रशिया सबंध आणि चीनचे रशियाकडून खनिज तेल खरेदी करणे, हार्मुझ मधून तेलाच्या जहाजांची वाहतूक निर्विघ्नपणे आणि कोणताही टोल न आकारता पूर्ववत सुरू होण्यासाठी चीन फारसे काही न करणे, दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीबद्दल चीनने तळ्यात मळ्यात करणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानांबद्दल चिनी कंपन्यांनी अमेरिकेन कंपन्यांच्या नाकात दम आणणे आणि…अर्थात तैवान ! ज्याचा हट्ट चीनने न सोडणे.
त्यामुळे परवाच्या जिनपिंग भेटीत खूप काही ब्रेक थ्रू मिळतील अशी अपेक्षा कोणीच ठेवत नव्हते. अपेक्षेप्रमाणे भेटीत फोटो सेशन झाली. भेटीअंती पत्रके निघाली.
ट्रम्प यांनी चीनकडून बऱ्याच अपेक्षा व्यक्त केल्या. जिनपिंग यांनी पुन्हा एकदा Thucydides ट्रॅप चा उल्लेख केला. ज्याचा अर्थ असा की ज्यावेळी उगवती सत्ता , आधीच सर्वोच्च स्थनावर असणाऱ्या सत्तेला गाठू पाहते, त्यावेळी त्या दोन महासत्तानी शहाणपणा दाखवला नाही तर दोघीही जीवघेण्या युद्धात अडकतात. सर्वांची अपरिमित हानीच होते.
अमेरिका आणि चीन यांनी एकमेकांविरुद्ध लावलेले आयातकर कमी करण्यात येतील. दोन्ही देशातील व्यापार आणि गुंतवणूक वाढीसाठी संस्थात्मक यंत्रणा स्थापन करण्यात येईल अशा म्हटल्यातर निरागस गोष्टींवर सहमती झाल्याचे सांगण्यात येते
तेवढेच महत्वाचे आहे त्यांच्या नजीकच्या काळातील ठरलेल्या भेटी. पुढच्या काही महिन्यात आशिया पॅसिफिक आणि जी-२० गटाच्या बैठकीदरम्यान हे दोन नेते पुन्हा एकदा भेटणार आहेत.
जगाच्या दृष्टीने आज आणि नजीकच्या काळात सर्वात कळीचा प्रश्न ठरणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान विकास, ज्याची नक्की दिशा काय असेल ? त्यावर माणसाचे नियंत्रण राहू शकेल का ? याबद्दल हे तंत्रज्ञान विकसित करणारे खुद्द शास्त्रज्ञ शंका उपस्थित करू लागले आहेत. गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटना या शंका काल्पनिक नाहीत हेच सिद्ध करत आहेत.
या क्षेत्रातील आघाडीच्या शास्त्रज्ञांनी, अमेरिकेतील काही राजकीय नेत्यांनी एआय तंत्रज्ञान विकासाचा वेग कमी करण्यावर , त्याला विकसित करणाऱ्या कंपन्यांना शासकीय रेग्युलेटर मार्फत जाबदायी करण्याची मागणी केली आहे. त्याला बराच पाठिंबा मिळू लागला आहे.
अमेरिकेत या मागणीला विरोध करणाऱ्यांमध्ये एक मोठा गट आहे. ज्याचे प्रमुख स्वतः ट्रम्प आहेत. या गटाचे म्हणणे असे की अमेरिकेने आपला तंत्रज्ञान विकासाचा वेग एकतर्फी कमी केला तर चीन या तंत्रज्ञानात अमेरिकेच्या पुढे निघून जाईल. ज्याचे दूरगामी परिणाम अमेरिकेवर होतील.
इथे मुद्दा आपल्यासकट सर्व जगाचा बनतो. अमेरिका आणि चीनने एकत्र बसून जगाच्या भल्यासाठी काहीएक शहाणपणाचा निर्णय घेण्याचा बनतो. ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. जे चान्गले लक्षण आहे.
त्यावेळचा सोवियेत रशिया आणि अमेरिका दोघेही तुल्यबळ अण्वस्त्र धारी देश होते. १९६२ सालात क्युबाच्या भूमीत / समुद्रात त्यांच्यात अण्वस्त्र युद्ध होण्याची शक्यता तयार झाली होती. पण दोन्ही देशांच्या राजकीय नेतृत्वाने सामोपचाराने घेतले. आणि त्यानंतर त्यांच्यात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अण्वस्त्र न वापरण्यासाठी अनेक करार मदार झाले. ज्याची फळे सर्व जगाला मिळाली आहेत.
एआय च्या संबंधात अमेरिका आणि चीनने अशाच प्रकारची परिपक्वता दाखवण्याची तातडीची गरज आहे






