दुष्काळी सर्व्हेचा उद्देश, आदेश आणि संकलित माहिती सरकारने जाहीर करावी — राजेंद्र पातोडे
मुंबई : राज्यातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालत असल्याच्या बातम्या समोर येत असून, यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या अंधारात गावांवर ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या या सर्व्हेचा नेमका उद्देश काय आहे, हा सर्व्हे कोणाच्या आदेशाने केला जात आहे आणि त्यातून कोणती माहिती संकलित केली जात आहे, याबाबत सरकारने तातडीने पारदर्शक माहिती जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.
राज्यात अनेक भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके सुकत आहेत, विहिरी आटत आहेत आणि पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत दुष्काळाचे वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय मूल्यांकन होणे आवश्यक आहे.
दुष्काळाचे मूल्यांकन करताना पर्जन्यमान, पीकस्थिती, जलस्रोत, मृदा आर्द्रता तसेच इतर वैज्ञानिक निकषांचा विचार केला जातो. मातीतील ओलावा हा पिकांच्या स्थितीशी आणि कृषी दुष्काळाशी संबंधित महत्त्वाचा घटक आहे. पावसाची कमतरता, वाढते तापमान आणि बाष्पीभवन यामुळे जमिनीतील आर्द्रता कमी होत जाते आणि त्याचा थेट परिणाम पिकांवर होतो.
महाराष्ट्रात दुष्काळाचे मूल्यांकन करताना विविध निकषांचा एकत्रित विचार केला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि जलस्रोतांची स्थिती यांचे पारदर्शक सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. मात्र, रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे सर्व्हे करण्याची आवश्यकता का भासली, याचे स्पष्टीकरण सरकारकडून अद्याप देण्यात आलेले नाही.
दिवसा गावागावात शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना रात्रीच्या अंधारात गावांवर ड्रोन घिरट्या घालत आहेत. हा नेमका कोणता सर्व्हे आहे? तो कोणत्या विभागाच्या आदेशाने सुरू आहे? कोणती यंत्रणा हा सर्व्हे करत आहे? किती गावांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला? कोणता डेटा संकलित केला जात आहे? आणि या डेटाचा दुष्काळाच्या मूल्यांकनात नेमका कसा वापर केला जाणार आहे? असे अनेक गंभीर प्रश्न राजेंद्र पातोडे यांनी उपस्थित केले आहेत.
सरकार दुष्काळाची तीव्रता कमी दाखवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना मिळणारी मदत टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अपारदर्शक सर्व्हे करत असेल, तर ते शेतकऱ्यांच्या हक्कांशी अन्याय करणारे ठरेल. दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी कागदोपत्री आकडेवारीचा खेळ चालू ठेवता येणार नाही.
दुष्काळ आहे तर तो दुष्काळ म्हणून जाहीर झाला पाहिजे आणि त्यानुषंगाने तातडीने मदत मिळाली पाहिजे. पिकांचे नुकसान झाले असेल तर तात्काळ पंचनामे झाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे.
रात्रीच्या ड्रोन सर्व्हेबाबत सरकारने संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी. सर्व्हेचा आदेश, त्यामागील उद्देश, संबंधित विभाग, सर्व्हेची व्याप्ती, संकलित करण्यात येणारा डेटा आणि त्याचा दुष्काळ मूल्यांकनासाठी होणारा वापर याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी.
शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत कोणतीही तडजोड मान्य केली जाणार नाही. दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ करणे थांबवा, पारदर्शक सर्व्हे करा, खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती संकलित करण्याचा प्रकार थांबवा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.






