वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सोमवारी (२८ सप्टेंबर) ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांनी केले. मोर्चानंतर विद्यापीठ प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांवरील दाखल करण्यात आलेले एफआयआर मागे घेण्यात आले आहेत. तसेच प्रवेशबंदीचा निर्णयही मागे घेण्यात आला आहे.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चांगली मेस सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, बंद करण्यात आलेले अभ्यासक्रम पुन्हा सुरू करणे, तसेच दहा वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या विविध सुविधा उपलब्ध करून देणे, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या सहा दलित-बहुजन विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. आजच्या मोर्चानंतर या विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घेण्यात आला असून प्रवेशबंदीचा निर्णयही रद्द करण्यात आला आहे. उर्वरित मागण्या व्यवस्थापन समितीसमोर मांडून त्यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वी १० सप्टेंबर रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने वर्धा येथे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घेणे, प्रवेशबंदीचा निर्णय रद्द करणे आणि इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, निर्धारित मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्याने सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने पुन्हा ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’ काढण्यात आला.
हा मोर्चा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, आर्वी नाका येथून सुरू झाला. मोर्चा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी गेट परिसरात पोहोचला. यावेळी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली. ‘तमाशाही नहीं चलेगी’, ‘No More Rohith Vemula’ अशा घोषणांसह विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
मोर्चानंतर सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घेणे, प्रवेशबंदीचा निर्णय रद्द करणे आणि इतर मागण्या व्यवस्थापन समितीसमोर मांडून सोडविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना यश मिळाल्याचे आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता प्रशांत बोराडे, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





