लातूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत निलंगा शहर व ग्रामीण भागातील शेकडो मुस्लिम आणि बहुजन समाजातील तरुणांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला.
रविवार (दि. २७) निलंगा येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वंचित बहुजन युवा आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष नितीन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या लातूर जिल्हा महिला अध्यक्षा मंजुषाताई निंबाळकर, युवा नेते आरिफ भाई पठाण, जिल्हा उपाध्यक्ष सद्दाम नासरजंग, युवा नेते भास्कर मस्के, जिल्हा प्रवक्ते चक्षुपाल कांबळे, युवा नेते स्वप्निल सूर्यवंशी आणि सौरभ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नितीन गायकवाड यांनी सर्व बहुजन समाजाला सत्तेच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्याचे आवाहन केले. तसेच तरुणांनी मोठ्या संख्येने संघटित होऊन सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले. तसेच मंजुषाताई निंबाळकर यांनी तरुणांनी ॲड . बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमाणसापर्यंत पोहोचवून संघटन मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. शेकडो तरुणांच्या पक्षप्रवेशामुळे निलंगा शहर आणि ग्रामीण भागात वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला बळ मिळाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.






