पुस्तकाचे नाव: आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे
लेखक : डॉ. ज्ञानराजा चिघळीकर
प्रकाशक : रुपी पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड
गडहिंग्लज. 9822651377
मूल्य: ₹ 55
सम्यक परिचय – किशोर कासारे मंडणगड (दाभट ) 8767425180
2 जून 1936, मुंबई. मातंग समाज परिषदेत प्रबोधन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “समाजामध्ये ऐक्य ठेवा.” बाबासाहेबांचा हा ऐक्याचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा झाला आहे, आणि तोच संदेश डॉ. ज्ञानराजा चिघळीकर लिखित ‘आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे’ हे पुस्तक अधिक ठामपणे अधोरेखित करते.
आज उप-वर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवर महार-मातंग समाजात जी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न काही कुटील प्रवृत्तींकडून होत आहे, त्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरते. भरकटलेल्या युवक-विद्यार्थ्यांपर्यंत खरा आंबेडकरवाद पोहोचवण्याचे अत्यंत मोलाचे कार्य या छोटेखानी पण आशयघन पुस्तकाने केले आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा प्रारंभिक काळ जरी साम्यवादी चळवळीत गेला असला, तरी त्यांच्या जीवनाचा उत्तरार्ध पूर्णपणे आंबेडकरवादाने भारलेला आणि बहरलेला होता, हे लेखकाने अत्यंत अभ्यासूपणे दाखवून दिले आहे.
लेखकाचा मुख्य म्हणणे असे आहे की,अण्णाभाऊंचे साहित्य हे केवळ कथा-कादंबरी नाही, तर ते स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, विज्ञाननिष्ठा आणि धर्मनिरपेक्षता या समतावादी व मानवतावादी मूल्यांचा आग्रह धरणारे बंड आहे. त्यांनी केवळ कथा सांगितल्या नाहीत, तर सामाजिक न्यायाच्या बाजूने आणि सामाजिक-आर्थिक शोषणाच्या विरोधात आपल्या लेखणीतून कायम लढा दिला.
या पुस्तकातील अनेक महत्त्वाचे दाखले लेखकाने अतिशय मार्मिकपणे मांडले आहेत. एक म्हणजे, अण्णाभाऊंनी आपली अजरामर कादंबरी ‘फकिरा’ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली.हा केवळ अर्पण करण्याचा उपचार नव्हता, तर वैचारिक निष्ठेची जाहीर घोषणा होती. दुसरा दाखला म्हणजे ‘बुद्धाची शपथ’ या कथेतील प्रसंग सांगून अण्णाभाऊंनी सर्वांनी बौद्ध धम्माकडे वळले पाहिजे, हा स्पष्ट संदेश दिला होता. आंबेडकरी विचारांमधील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि बौद्ध धम्मातील नैतिकता व सदाचार या मूल्यांना अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यात सर्वोच्च स्थान दिले होते, हे लेखक ठासून सांगतात.
आज जेव्हा समाजात फूट पाडून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे, तेव्हा डॉ. चिघळीकर यांचे हे पुस्तक आपल्याला महार आणि मातंग यांच्यात रुंदावत चाललेली दरी कमी करून “समाजामध्ये ऐक्य ठेवा” हा बाबासाहेबांचा संदेश पुन्हा रुजवण्यास निश्चितच मदत करते.
समाजात फूट पाडणाऱ्या कुटील प्रवृत्तीचा डाव हाणून पाडूया आणि चला आंबेडकरवादी होऊया, हा या पुस्तकाचा थेट आणि मनाला भिडणारा संदेश आहे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केवळ एका जातीचे नायक म्हणून न पाहता, आंबेडकरवादी चळवळीचा एक महत्त्वाचा वैचारिक आधारस्तंभ म्हणून समजून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश कमिटीच्या वतीने ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला...
Read moreDetails






