पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मेसच्या दरवाढीच्या प्रश्नावर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (२२ सप्टेंबर) विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची भेट घेऊन चर्चा केली. विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मेसचे वाढवलेले दर कमी करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.
तळागाळातून तसेच सामान्य कुटुंबातून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी मेसच्या दरातील वाढ आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याची भूमिका शिष्टमंडळाने कुलगुरूंसमोर मांडली. विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
मेसचे दर कमी न केल्यास विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शिष्टमंडळाने यावेळी दिला.
या भेटीदरम्यान सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहराचे उपाध्यक्ष प्रज्योत गायकवाड, सदस्य वैभव शिंदे तसेच आंबेडकरी कार्यकर्ते श्रीकांत कांबळे उपस्थित होते.






