अकोला : मुंबई येथे १ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आम्ही इराणसोबत आहोत’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सर्किट हाऊस, अकोला येथे पार पडली. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे होणाऱ्या या आंदोलनात अकोला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी यावेळी केले.
या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय सचिव ॲड. खतीब साहेब, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र भाऊ पातोडे, केंद्रीय सदस्य अरुंधतीताई शिरसाट, तसेच प्रमोद देंडवे, मिलिंद इंगळे, आम्रपालीताई खंडारे, राजकुमार दामोदर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी भारत आणि इराण यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख करत इराणने भारताला विविध प्रसंगी केलेल्या सहकार्याचा मुद्दा मांडला. तसेच, केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही त्यांनी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या धोरणांचा भारतीय अर्थव्यवस्था आणि महागाईवर परिणाम होत असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारची भूमिका काहीही असली तरी भारताची जनता इराणसोबत आहे, हा संदेश देण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनात अकोला जिल्ह्यातून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. अंजलीताई आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे आणि केंद्रीय सचिव ॲड. खतीब साहेब यांनी केले.
बैठकीचे सूत्रसंचालन मिलिंद इंगळे यांनी केले, तर आभार राजकुमार दामोदर यांनी मानले. बैठकीला अकोला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






