नागपूर : दीक्षाभूमीवर भगवा झेंडा फडकविल्याचे दर्शविणारे एक पोस्टर काँग्रेस पक्षाकडून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातील संबंधितांवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात निवेदन दिले.
यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, दीक्षाभूमीसारख्या पवित्र स्थळाचा वापर करून जाणूनबुजून समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संबंधित पोस्टरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचा तसेच दीक्षाभूमीवर भगवा झेंडा दाखवून आंबेडकरी समाजाचा अपमान करण्यात आला.
दीक्षाभूमी दक्षता समितीच्या अध्यक्षा माया यांनी संबंधितांना इशारा देत म्हटले की, “या कृत्यामागील व्यक्तींनी तात्काळ समाजाची माफी मागावी. अन्यथा आम्ही पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर सक्षम अधिकाऱ्यांकडे जाऊन कठोर कारवाईची मागणी करू.” दलित पँथरचे विदर्भ अध्यक्ष आशीष बन्सोड यांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून शिवराज मोरे यांचे नाव घेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच संबंधितांनी सार्वजनिक माफी मागून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
वंचित बहुजन आघाडी, दलित पँथर, बसपा आणि इतर संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, २४ तासांच्या आत गुन्हा दाखल झाला नाही तर मोठे आंदोलन उभारण्यात येईल. त्यांनी काँग्रेस पक्षालाही या प्रकरणात भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. काही वक्त्यांनी असे सांगितले की, दीक्षाभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा वापर करून राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकारामुळे आंबेडकरी समाज, बौद्ध समाज आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी संबंधित पोस्टर तयार करणाऱ्या व प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तींवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, योग्य कारवाई न झाल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला. दरम्यान, या संदर्भात सीताबर्डी पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले असून, पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.






