मुंबई : शहरातील आग्रीपाडा परिसरातील एका आलिशान निवासी टॉवरमध्ये एमडी ड्रग्जची गुप्त निर्मिती सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल ५० कोटींहून अधिक किमतीचे एमडी, रसायने, यंत्रसामग्री आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात एका तरुणीसह तिघांना अटक करण्यात आली असून, आरोपींनी फ्लॅटच थेट ड्रग्ज फॅक्टरीमध्ये रूपांतरित केल्याचे समोर आले आहे.
अमली पदार्थविरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर सोमवारी छापा टाकण्यात आला. आग्रीपाड्यातील यास्मिन टॉवरमधील सदनिकेत सुरू असलेल्या या कारवाईदरम्यान पोलिसांना भुकटी आणि द्रवरूपातील मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्ज सापडले. याशिवाय एमडी निर्मितीसाठी लागणारी रसायने, विविध यंत्रसामग्री, देशी बनावटीचे पिस्तूल आणि १९ जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली. (Agripada MD Drugs Case)
Also Read : केरळच्या राजकारणात मोठी खळबळ; माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या घरावर ED चा छापा!
या प्रकरणात मामुनी सरकार, शोएब मन्सूरी आणि सूफियान मन्सूरी यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी शोएब मन्सूरी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर चोरी, जबरी चोरी, मारामारी यांसारखे २३ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एमडीचे व्यसन लागल्यानंतर त्याने थेट त्याचे उत्पादन सुरू केल्याचे तपासात उघड झाले.
पोलिसांच्या मते, शोएबने एखाद्या बेकायदेशीर ड्रग्ज कारखान्यातून प्रशिक्षण घेतले असावे किंवा ऑनलाइन माध्यमातून त्याला मार्गदर्शन मिळाले असावे. या दृष्टीने तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, आरोपींनी हा फ्लॅट दोन महिन्यांपूर्वी ४५ हजार रुपये मासिक भाड्याने घेतला होता. त्यानंतर टप्प्याटप्याने यंत्रसामग्री आणून महिनाभरापासून एमडी निर्मिती सुरू केली होती. (Agripada MD Drugs Case)
Also Read : 23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा – ॲड. प्रकाश आंबेडकर
एमडी तयार करताना निर्माण होणारा तीव्र रासायनिक वास बाहेर जाऊ नये म्हणून आरोपींनी घरात अनेक एसी बसवून ते सतत सुरू ठेवले होते. तसेच वास दडवण्यासाठी २४ तास धूप जाळला जात होता. दरम्यान, अटक करण्यात आलेली मामुनी सरकार ही बांगलादेशी नागरिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, ती काही वर्षांपासून मुंबईत बेकायदेशीररीत्या राहत असल्याचा संशय आहे. यासंदर्भातही अधिक तपास सुरू आहे. या कारवाईनंतर मुंबईतील उच्चभ्रू परिसरातही ड्रग्ज उत्पादनाचे जाळे किती खोलवर पोहोचले आहे, याची गंभीर चर्चा सुरू झाली आहे.






